चिपळूण :
जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल न मिळाल्याने सांगली जिह्यातील एका ठेकेदाराने आत्महत्या केल्यानंतर येथील ठेकेदारही आक्रमक झाले आहेत. गुरुवारी येथील पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांची भेट घेत आत्महत्येची वेळ आमच्यावरही आणू नका, असा संतप्त सवाल करत यापुढे तालुक्यातील सर्व पाणीयोजनांची कामे थकित देयके मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला.
घरगुती नळ जोडणीद्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी हा उद्देश घेऊन केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिह्यात सुमारे 1,200 कोटींच्या खर्चाचा आराखडा आखण्यात आला. त्यानुसार अनेक पाणी योजनांची कामेही मार्गी लागली. मात्र झालेल्या कामांच्यापोटी जिह्याला दीड वर्षात केवळ 15 ते 20 टक्केच निधी उपलब्ध झाल्याने कामे करणारे ठेकेदार हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे देयकांअभावी कामेही अर्धवट राहिली आहेत. थकित देयकांसाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही बिले मिळत नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी जलजीवन मिशनची थकित देयके न मिळाल्याने सांगलीत एका ठेकेदाराने आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
गुरुवारी सायंकाळी जलजीवन मिशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे दशरथ दाभोळकर तसेच आर. जी. कुलकर्णी, संतोष जाधव, राजेश सुतार, योगेश सुतार, तुषार चव्हाण यांच्यासह अन्य ठेकेदारांनी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शैलेश बुटाला यांची भेट घेत थकित देयकासंदर्भात कैफियत मांडली. कामांसाठी बँकांकडून काढलेले कर्जही थकित राहिल्याने कर्जावर दिवसेंदिवस व्याज वाढत चालले आहे. त्यामुळे येथील ठेकेदार आर्थिक विवंचनेत असून त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणून देऊ नका. लवकरात लवकर थकित देयके द्या. यापुढे जोपर्यत देयके मिळत नाही तोपर्यंत तालुक्यातील पाणी योजनांची कामे सुरू केली जाणार नाहीत. कोणत्याही ठेकेदारांवर कामे सुरू करण्यासाठी जबरदस्ती करू नये, असेही बजावले.








