दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठा करा : शेतकऱ्यांची मागणी कायम : अधिकाऱ्यांची घेतली पुन्हा भेट
वार्ताहर/किणये
वाघवडे-किणये परिसरात शेतकऱ्यांना दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठा देण्यात येत नाही. पहाटे व रात्रीच्या वेळी हा पुरवठा दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री व पहाटे शेतातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अंधारात आम्ही पिकांना पाणी द्यायचे कसे? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बळीराजाच्या आरोग्याचा विचार हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी करायला हवा. त्यामुळे आता बळीराजाच्या जीवाशी खेळू नका, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या भागातील शेतकऱ्यांना दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठा द्या. यासाठी अनेक वेळा मोर्चे व आंदोलने करण्यात आली आहेत. ही मागणी शेतकऱ्यांची कायम असून पुन्हा गुऊवारी सकाळी हेस्कॉमच्या मुख्य अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली आहे. वाघवडे, संतिबस्तवाड, किणये, कर्ले, बहाद्दरवाडी या भागातील शिवारांमध्ये थ्रीफेज विद्युत पुरवठा सुरळीत देण्यात येत नाही. यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. पहाटे सहाच्या दरम्यान थ्रीफेज विद्युत पुरवठा सुरू केला जात आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून पिकांना पाणी द्यायचे कसे तसेच या वेळेला शिवारात धुके पडलेले असते. तसेच रात्री दहा ते बारा या वेळेत थ्रीफेज विद्युत पुरवठा पुरविला जात आहे. मग एखाद्या पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी अंधारात शेतकऱ्यांना शिवारात जाण्याची वेळ आली आहे.
ऊस लागवड जोमात
या भागातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. या भागात ऊस लागवड अधिक प्रमाणात करण्यात येते. सध्या ऊस लागवडीची कामे जोमाने सुरू आहेत. या उसाला पाणी देण्याची गरज आहे. म त्र रात्रीच्यावेळी विद्युत पुरवठा दिला जात असल्यामुळे ऊस पिकाला पाणी देण्यासाठी रात्रभर जागरण करावी लागत आहे. या भागात उन्हाळी बटाटे, रताळी लागवड ही करण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे भाजीपाला पिके शेतकरी घेत आहेत. या पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. हे पाणी देण्यासाठी शिवारात सुरळीत थ्रीफेज विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे. या भागातील काही शेतकऱ्यांची घरे शिवारात आहेत. त्यांची मुले शाळा, हायस्कूल, व कॉलेजला जातात शिवारातील घरांमध्ये रात्रीच्या वेळी सिंगल फेज पुरवठा सुरळीत दिला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशी माहिती पालकांनी दिली.
आश्वासनाची पूर्तता नाही
थ्रीफेज विद्युत पुरवठ्याच्या मागणीसाठी दि. 4 फेब्रुवारी रोजी मच्छे विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी हेस्कॉम कार्यालयाला घेराव घातला. व रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी चार ते पाच दिवसात दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठा देणार असे सांगितले होते. यावेळी समितीचे नेते उमाकांत कोंडुसकर, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी अध्यक्ष राजू किणेकर आदींसह या भागातील शेतकरी उपस्थित होते.
थ्रीफेजवर आज तोडगा निघणार
हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दि. 7 रोजी या भागातील काही शेतकऱ्यांना पुन्हा बोलावून घेतले. पुन्हा दोन-तीन दिवसाची मुदत मागून घेतली होती. अखेर हेस्कॉमने थ्रीफेज विद्युत पुरवठा दिलाच नाही. यामुळे गुऊवार दि. 13 रोजी या भागातील शेतकऱ्यांनी हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी चिकार्डे यांची भेट घेतली व दिवसा थ्रीफेज विद्युत पुरवठ्याची मागणी केली. यावेळी शुक्रवारी याबाबत योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन मुख्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, आर. के .पाटील, मोनापा पाटील आदीसह शेतकरी उपस्थित होते.









