बी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन, आभासी चलनासंबंधी समान धोरणाचा पुरस्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कृत्रिम बुद्धीमत्ता हे आवश्यक तंत्रज्ञान आहे. मात्र, याचा उपयोग नैतिककेच्या चौकटीतच व्हावा. या तंत्रज्ञानावर कोणाचा एकाधिकार असू नये. तसेच त्याच्या उपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर एक नियंत्रण मंच निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते बी-20 परिषदेच्या बैठकीत भाषण करीत होते. आभासी चलनाच्या नियंत्रणासाठीही जागतिक पातळीवर समानरित्या प्रयत्न केले जाण्याची आणि समान नियमावली निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान हा तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार आहे. तथापि, त्याचा अनिर्बंध आणि एकहाती उपयोग घातक ठरु शकतो. हे तंत्रज्ञान केवळ काही मोजक्यांच्याच हाती असले तर जगाचा समतोल बिघडू शकतो. तसे होऊ न देण्याची दक्षता विश्वसमुदायाने एकत्रितरित्या घेणे आवश्यक आहे. तसेच या तंत्रज्ञानाच्या सामाजिक उपयोगावर आणि त्याच्या परिणामांवरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी महत्वपूर्ण सूचनाही त्यांनी भाषणात केली.
सीआयआयकडून परिषदेचे आयोजन
बी-20 परिषदेचे आयोजन सीआयआय या औद्योगिक संघटनेने केले आहे. या परिषदेचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि त्यावरील नियंत्रण यांच्यासंबंधी प्रबोधन करणे हा आहे. इन्फोसिसचे माजी अधिकारी नंदन निलेकणी यांनीही या परिषदेत भाषण केले. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि त्यावरील नियंत्रण या संबंधात भारताने उत्तम समतोल सांभाळण्याचे काम केले आहे. भारताने संशोधन क्षेत्रातही प्रगती साध्य केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या विषयाचे महत्वही त्यांनी विशद केले.
विविध विषयांवर मतप्रदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या अखेरच्या दिवशी बोलताना विविध विषय हाताळले. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या समवेतच मानवाला आवश्यक असणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा ही महत्वाची बाब आहे. जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळ्या सुरळीत ठेवण्यासाठी विशिष्ट धोरण लागू करणे आवश्यक आहे. भारत सरकारने त्यादृष्टीने एक योजना सज्ज केली असून ती लागू करण्यात येत आहे. भारताला आज या पुरवठा साखळीत जागतिकदृष्ट्या महत्वाचे स्थान मिळाले आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. गेल्या 100 वर्षांमध्ये प्रथमच भारताने जगात स्वत:संबंधी विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे, ही बाब त्यांनी आवर्जून स्पष्ट केली.
पर्यावरणस्नेही उद्योग आवश्यक
या परिषदेत बोलताना आयटीसीचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी पर्यावरणस्नेही उद्योगांचे महत्व नमूद केले. पर्यावरणाच्या असमतोलाने हवामान आणि पर्जन्यमान यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी उद्योगांनी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा विकास करणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर उद्योगांनाही त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सावधानतेची आवश्यकता असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी केले.
खलिस्तानवाद्यांचे उपद्व्याप
बी-20 परिषदेच्या शेवटच्या दिवशी आणि जी-20 शिखर परिषद जवळ आलेली असताना दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेची चिंता वाढविणाऱ्या घटना घडल्या आहेत. काही खलिस्तानवाद्यांनी दिल्लीच्या मेट्रो स्थानकांवर प्रक्षोभक घोषणा लिहून ठेवल्याने तणाव निर्माण झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली बनेगा खलिस्तान आणि खलिस्तान झिंदाबाद अशा घोषणा या स्थानकांच्या भितींवर आढळून आल्या आहेत. नंतर दिल्ली प्रशासनाने या घोषणा पुसून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या घटनेमुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी-20 शिखरपरिषदेसाठी अधिक कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.
आता वेध जी-20 चे
बी-20 परिषद संपल्यानंतर आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतच होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेचे वेध साऱ्यांना लागले आहेत. भारताच्या अध्यक्षतेत होणारी ही शिखर परिषद भारत आणि जी-20 साठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. जी-20 चा नुकताच विस्तार करण्यात आला असून संघटनेचा जगावरील प्रभाव त्यामुळे वाढणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.









