मामलेदारांकडून चालढकलपणा होत असल्याचा कुळ-मुंडकार समितीचा आरोप
पणजी ; मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कुळ-मुंडकारांचे खटले सहा म]िहन्यांत निकाली काढण्याचा आदेश देऊनही राज्यातील कुळ-मुंडकार बांधवांची फरफट सुरू आहे. मामलेदारांकडे वारंवार मागणी करूनही तसेच महसूल कार्यालयाचे उंबरे झिजवूनही चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांच्या आत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यातील कुळ-मुंडकारांचे खटले निकाली काढून न्याय द्यावा, अशी मागणी बार्देश-पेडणे तालुक्यातील कुळ-मुंडकार समितीने केली आहे. पणजी येथे गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला बार्देश-पेडणे कुळ-मुंडकार समितीचे प्रवक्ते संतोष मांद्रेकर, संघटक दिपेश नाईक, सदस्य नारायण गडेकर, दिलीप कोरगावकर उपस्थित होते. समितीचे प्रवक्ते संतोष मांद्रेकर म्हणाले, गोवा मुक्तिनंतर सरकारचा कारभार चालवताना भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात ‘कसेल त्याची जमीन, राहिल त्याचे घर’ हा कायदा आणण्याचा चांगला लोकहितवादी निर्णय घेतला. परंतु त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारने कुळ-मुंडकारांचे प्रश्न सोडविण्याऐवजी हा विषय भीजतच ठेवला. त्यामुळे आज आपल्या न्याय-हक्कासाठी कुंळ-मुंडकार बांधवांना झगडावे लागत आहे. कुळ-मुंडकारांचे अनेक खटले सरकार दरबारी सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. वारंवार समितीतर्फे मामलेदार, जिल्हाधिकारी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटूनही उपयोग होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ तारखेवर तारखा दिल्या जात आहेत. उच्च न्यायालयाने कुळ-मुंडकारांची प्रकरणे सहा महिन्यांत निकाली काढण्याचा दिलेला आदेशामुळे आतातरी मामलेदारांनी यावर त्वरित निर्णय द्यावा, अशी मागणीही मांद्रेकर यांनी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अन्यथा न्यायालयाचा अवमान ठरेल, असेही मांद्रेकर म्हणाले.
…तर अवमान याचिका दाखल करणार
कुळ-मुंडकारांचे प्रलंबित खटले सुटावेत यासाठी न्यायालयाने ही प्रकरणे सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश दिलेला आहे. सुमारे 911 कुळ-मुंडकार खटले सरकार दरबारी प्रलंबित आहेत. जिल्हाधिकारी व मामलेदार यांनी या खटल्यांवर आता लक्ष केंद्रीत करून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा महिन्यांत निकाली काढावेत. जर हे प्रलंबित खटले सहा महिन्यांत निकाली काढले नाहीत तर आंदोलनाचा मार्ग न पत्करता अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा कुळ-मुंडकार संघर्ष समितीचे संघटक दीपेश नाईक, प्रवक्ते संतोष मांद्रेकर यांनी दिला.









