जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध : विश्वासात न घेता निर्णय घेतला कसा? संतप्त सवाल
बेळगाव : अलतगा या ठिकाणी निसर्गसंपन्न वातावरण आहे. मात्र येथे कचरा टाकण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याला समस्त ग्रामस्थांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. या कचऱ्यामुळे अनेकांच्या आरोग्याचा व इतर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कचरा या परिसरात नको, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कोणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला कसा? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव शहरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अलतगा परिसरात बांधकाम कचरा (डेब्रीस) टाकण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र या कचऱ्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अचानकपणे हा निर्णय घेवून त्याची प्रत मनपाला पाठविली आहे. त्यानंतर ती नगररचना विभागाकडे देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र याला आमचा विरोध असणार आहे. कारण परस्पर निर्णय घेवून तो लादणाऱ्या प्रशासनाने किमान ग्राम पंचायतीचे म्हणणे तरी ऐकून घेणे गरजेचे आहे.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव शहर परिसराचा कचरा या परिसरात टाकण्यात आला तर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याचबरोबर अलतगा, जाफरवाडी, कंग्राळी खुर्द, कडोली, अगसगे, चलवेनट्टी, हंदिगनूरसह परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याचा आता गांभीर्याने विचार करून या ठिकाणी संबंधितांनी कचरा टाकू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
कर मनपाला, कचरा ग्रा. पं. हद्दीत
अलतगा येथील 10 एकर जागेत हा कचरा टाकण्यासाठी मंजुरी देण्यात आली असली तरी त्या ठिकाणी आम्ही विविध विकासकामे राबविणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होवू लागला आहे. दरम्यान, बांधकाम परवाना घेण्यासाठी मनपाला कर भरावा लागतो आणि त्याचा कचरा मात्र ग्राम पंचायत हद्दीत टाकणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यासाठी मनपाने जागा खरेदी करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीही अचानकपणे निर्णय घेवून अनेकांना याचा त्रास होईल, असेच दाखवून दिल्याने समस्त ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त हेत आहे. जिल्हा प्रशासनाने या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा,, अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
सध्या अलतगा गावात उद्योग खात्री योजनेतून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. जर अशा ठिकाणी कचरा टाकून त्याचे विद्रुपीकरण केल्यास ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे डेब्रीस कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इतरत्र जागा शोधावी. याचबरोबर स्वत: निर्णय घेण्यापेक्षा ग्राम पंचायत सदस्यांशीही चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता जिल्हाधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता गावातील सर्व नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.









