मोपा विमानतळ प्रकल्प बांधकाम कंपनीने योग्य नियोजन करावे : असा प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही : मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जन संघटनेचा इशारा
प्रतिनिधी /पेडणे
मोपा विमानतळ पठारावरून वारंवार पाणी सोडत असल्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे. यामुळे शेतकऱयांच्या शेती आणि बागायती नष्ट होत आहे. यावर योग्य उपाययोजना करून मोपा विमानतळ प्रकल्प बांधकाम कंपनीने पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे. ते पाणी गावात येऊ नये, खबरदारी घ्यावी. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटने पत्रकार परिषदेत बुधवारी दिला.
निगळ पोरस्कडे येथे बुधवारी 4 आणि 5 रोजी मोपा विमानतळावरून पहाटे पाणी सोडले. ते पाणी महादेव मंदिर आणि वस्तीत जाऊन लोकांच्या घरात शिरले. याशिवाय बागायतीतील घसून नव्याने लागवड केलेली झाडांची रोपे वाहून गेली. यामध्ये शेतकऱयांची मोठी नुकसानी झाली. याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कंपनीने योग्यती उपाययोजना करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष भारत बागकर, सरचिटणीस बया वरक, उपाध्यक्ष भास्कर नारुलकर, निमंत्रक उदय महाले, मनोज साळगावकर, शंकर साळगावकर , संजय आरोसकर आदी उपस्थित होते.
आमचा मोपा प्रकल्पाला विरोध नाहीः भारत बागकर
समितीचे अध्यक्ष भारत बागकर यांनी मोपा विमानतळाला आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही वारंवार जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन आवाज उठवतो. याचा अर्थ मोपा विमानतळाला आम्ही विरोध करतो असे नाही. ज्या मोपा विमानतळासाठी आणि लिंक रस्त्यासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. अनेक झाडे कापली गेली त्यांना नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. ती मिळावी आणि शेतकऱयांवरील अन्याय दूर व्हावा. ही आमची भूमिका आहे. आज मोपामुळे पाणीया भागात येऊन परत शेतकऱयांचे नुकसान होते, याचेही भान सरकारने ठेवावे आणि योग्य तोडगा काढावा, असे आवाहनही भारत बागकर यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवावे : बया वरक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळोवेळी मोपा पीडित शेतकऱयांनी विरोध करू नये. त्यांच्याशी चर्चा करायला आपण तयार असल्याचे जाहीर केले होते. निदान आता तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हांला चर्चा करण्यासाठी बोलवावे. आमचा विरोध मोपाला नाही. यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी बया वरक यांनी केली .
पावसाच्या पाण्याचे नियोजन करा : भास्कर नारुलकर
मोपा विमानतळ प्रकल्प कंपनीने वरील पाण्याचे नियोजन आणि प्रतिबंधक उपाय कोणत्या पद्धतीचे तयार केले आहेत. याची माहिती सर्वसामान्य जनतेला द्यावी, अशी मागणी समितीचे उपाध्यक्ष भास्कर नारुलकर यांनी केली. आमचा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र ज्या शेतकऱयांवर जनतेवर अन्याय झाला आहे, त्या पीडित शेतकऱयांना अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यांच्या नुकसानीसाठी आम्ही आवाज करतो. याचा अर्थ आम्ही या प्रकल्पाला विरोध करत आहोत, असे नाही. परंतु सरकारने माणुसकीच्या नजरेतून आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून पीडित शेतकऱयांना न्याय द्यावा, अशी मागणी भास्कर नारुलकर यांनी केली.









