पावसाळ्यात घरांची पडझड होत असल्याने आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : जोरदार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी घरांची पडझड तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरत आहे. याचबरोबर नालेही तुडुंब भरून वाहत आहेत. त्याची पाहणी महापौर सविता कांबळे, आयुक्त अशोक दुडगुंट्टी हे करत आहेत. मात्र निर्माण झालेल्या समस्या ते सोडविणार आहेत का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. शहरातील अनेक घरांची यापूर्वी पडझड झाली आहे. त्यांना अद्याप नुकसानभरपाई दिली गेली नाही. त्याचबरोबर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यांनाही कोणतीच नुकसानभरपाई दिली नाही. यामुळे पाहणी करता मात्र, समस्या सोडविणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी मदत करणार का? यापूर्वीच अनेक अर्ज महानगरपालिकेकडे पडून आहेत. केवळ दिखाऊपणा करण्यापेक्षा प्रत्यक्षात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे जनतेचे म्हणणे आहे.यावर्षी पूर आला आहे. त्यानंतर आता काही दिवस पाहणी करून काम करू असे आश्वासन दिले जाते. मात्र त्यानंतर त्याकडे फिरकुनही पाहीले जात नाही. आता उन्हाळ्यात याची खोदाई सुरू करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात नाला खोदाईसाठी पाठपुरावा करण्याची गरज
गेल्या काही दिवसांपासून मनपा आयुक्त अशोक दुडगुंट्टी हे बळ्ळारी नाला परिसराला भेट देत आहेत. मात्र पावसाळ्यात जाऊन पाहणी करण्यापेक्षा उन्हाळ्यात या नाल्याच्या खोदाईसाठी पाठपुरावा करण्याची गरज होती. पण या नाल्याच्या खोदाईसाठी कोणीच अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला नाही. हा नाला पाटबंधारे खात्याकडे येतो असे सांगून केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. जर पाटबंधाऱ्याचा नाला असेल तर त्या नाल्यामध्ये शहराच्या ड्रेनेज आणि गटारीचे पाणी का सोडता? असा प्रतिप्रश्न आता शेतकरी तसेच सर्व सामान्य जनता करत आहे.









