हमारा देश संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : दसरा हा सण आपल्या संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतिक आहे. परंतु या सणात राजकारण आणून हिंदुंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहे. म्हैसूर दसरोत्सवासाठी बानू मुश्ताक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या विरोधात जनतेच्या मनात तीव्र रोष असून सरकारने हे तात्काळ थांबवावे, अशी मागणी हमारा देश संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कर्नाटकात मोठ्या जल्लोषात दसरोत्सव साजरा होतो. विशेष करून म्हैसूर येथे पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा होतो. यावेळी देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमाला यावर्षी लेखिका बानू मुश्ताक यांना निमंत्रण करण्यात आले आहे. यामुळे हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. कर्नाटक सरकारने हिंदू धर्मियांची माफी मागावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी हमारा देश संघटनेचे व्यंकटेश शिंदे, संदीप भिडे, देवदत्त मांजरेकर, प्रकाश रायकर, सुजाता हिरेमठ, बसवराज हुलीमनी यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









