गडावरील अतिक्रमण निघाले पाहिजे हिच माझी भुमिका
विशाळगडाच्या विषयाला धार्मिक रंग आणू नये. तेथील अतिक्रमण हा विषय धर्माच्या पलिकडचा आहे. गडकोटांवर अतिक्रमणे काढली गेली पाहिजेत, हाच आमचा मूळ उद्देश्य आहे. त्यामुळे सर्व समाजातील, राजकीय पक्षातील व्यक्तीनीं विशाळगड अतिक्रमण प्रश्नाला धार्मिक रंग देवू नये, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, वास्तविक सरकारने अतिक्रमण काढण्यास वेळीच सुरुवात केली असती तर आंदोलन करण्याची वेळच आली नसती. या गोष्टीला उशीर झाला असला तरी 14 जुलै रोजी राज्य सरकारने आदेश दिले. न्यायप्रविष्ट नसलेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश दिले आणि ती काढली जात आहेत. पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढली आहेत. पावसाचा व्यत्यय येत आहे. टप्प्याटप्प्याने ती काढली जातील. विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत राज्य सरकारने जे धाडस दाखवले, तसेच धाडस अन्य गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबतही दाखवावे. तसेच ती अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने धोरण ठरवले पाहिजे. त्यात नियम आणि अटी घातल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, या विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बैठक लावा असेही सांगत होतो. याशिवाय छत्रपती शाहू महाराज यांच्याशीही चर्चा झाली होती. मात्र त्यात कोणीही काहीही केले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे त्यांनीही बैठक घेतली नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही हा विषय किती संवेदनशील होऊ शकतो हे माहित होते. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप संभाजीराजे यांनी केला.
जाळपोळीचे मी समर्थन करत नाही – संभाजीराजे छत्रपती
छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले हे मला माहीत नाही. जे घडले त्याचे मी समर्थन करत नाही. महाराष्ट्रात एकोपा राहिला पाहिजे. कोणताही धार्मिक रंग त्याला आणू नये. केवळ अतिक्रमण काढणे आणि विशाळगड अतिक्रमणातून मुक्त करणे हाच विचार आमचा होता आणि आहे, असे संभाजी महाराज म्हणाले. तसेच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपावर बोलताना छ. संभाजी महाराज म्हणाले की, मुळात ही वेळ आलीच का याचा विचार जलील यांनी केला आहे का?. तसेच या विषयावर ते बोलत आहेत, भीमा कोरेगाव या विषयात ते संसदेत का नाही बोलले? तुम्ही महाराष्ट्रात जाती धर्मावर बोलू नका त्याचे वाईट पडसाद उमटले, तर त्याला जबाबदार जलील स्वत: राहतील.