नृत्यांगना सावित्री मेधातुल यांचे आवाहन
प्रज्ञा मणेरीकर /पणजी
लावणी हा नृत्यप्रकार दुर्लक्षित नसून काही भागात त्याच्याबाबतीत अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झाले आहेत. ते बदलणे गरजेचे आहे. लावणी ही महाराष्ट्रीच्या ग्रामीण भागात प्रसिद्ध आहे. हा नृत्यप्रकार हळुहळु विकसित होत आहेत. चित्रपटांच्या प्रभावांमुळे लावणी सादर करण्याची जी पारंपारिक पद्धत आहे त्यात बदल होत आहेत. लावणी बदलली तरीही लावणी विसरू नका हो पाव्हणं लावणी विसरू नका असे उद्गार काली बिल्ली प्रॉडक्शनच्या कलादिग्दर्शक व नृत्यांगना सावित्री मेधातुल यांनी काढले. पणजीत सुरू असलेल्या सेरेंडिपिटी कला महोत्सवात नुकताच लावणी नृत्यप्रकार सादर करण्यात आला. त्यानिमित्ताने तरूण भारतच्या प्रतिनिधीने लावणीबद्दल जाणून घेण्यासाठी सावित्री मेधातुल यांच्याशी सहर्ष संवाद साधला.
लहानपणापासूनच लावणीबाबत उत्सुकता
सध्या लावणीत पारंपारिक लावणी गीतांपेक्षा चित्रपटगीतांची मागणी जास्त दिसून येतो. याशिवाय काहीजणांच्यामते लावणी हा प्रकार म्हणजे एका वाईट गोष्टींचे सादरीकरण. ही विचारसरणी बदलणे गरजेची आहे. लहानपणापासूनच मला लावणीबाबत उत्सुकता आणि आवड होती. लहानपणी मी लावणी पाहायचे. परंतु 2005 सालापासून गांभीर्याने मी लावणीविषयी संशोधन सुरू केले. मासमीडीयामधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर माझ्या पहिल्या लघुपटासाठी कथा शोधण्याकरिता मी लावणीमध्ये गांभीर्याने संशोधन सुरू केले. महाराष्ट्रात लावणी प्रसिद्ध आहे. राज्याच्यादृष्टीने गोव्यातसुद्धा लावणीबाबत योग्यरित्या जागरूक करणे गरजेचे आहे. कलाकार नसतील तर कला नसेल त्याकरिता आम्ही कलेचे जतन करणे फार महत्त्वाचे आहे असे मत सावित्री मेधातुल यांनी व्यक्त केले.
कलाकारांची योग्यरित्या काळजी घेणे गरजेचे
कोविड काळात लावणी कलाकारांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अनेकांना कोविडमुळे कार्यक्रम सादर करता आले नाही. जो आर्थिकरित्या व सांस्कृतिकरित्या धक्का होता. त्यामुळे आपल्या कलाकारांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कलाकारांची काळजी योग्यरित्या घेण्यात आली नाहीतर कला पुढे कशी जाईल ? जर लावणीला एक उदयोन्मुख नृत्यकलाप्रकार म्हणून ओळखला जात आहे तर त्याची योग्यरित्या काळजी घेणे आवश्यक आहे. परिणामतः नवीन पिढीसुद्धा या प्रकारात रस दाखवतील. जर अशीच परिस्थिती लावणीची राहिली तर जुनी व अमूल्य परंपरा इथेच संपून जाईल. लावणीला तसेच लावणी कलाकारांना सकारात्मक पाठिंबा देणे गरजेचे आहे. मग तो आर्थिकरित्या असो किंवा प्रेक्षकांच्यादृष्टीने असो. चांगल्या कलाकाराला ही चांगल्या प्रेक्षकांची गरज असते. कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक वेगळे नाते असते ते प्रत्येकाने टिकविले पाहिजे आणि कलाकाराला प्रोत्साहित केले पाहिजे असे मत सावित्री यांनी यावेळी व्यक्त केले.
बदलत्या लावणी प्रकाराची मजा काही औरच
फार वर्षांपूर्वीपासून लावणी प्रकाराला सुरूवात झाली आणि रमली. आता तर लावणी हा प्रकार तमाशा, बॅनर शोसाठी आयोजित केली जाते. तसेच ग्रामीण भागाबरोबरच चित्रपटात दाखविले जात असल्याने शहरातही लावणीचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात लावणी विकसित झाला आहे. लावणी हा कलाप्रकारात काळाप्रमाणे बदल होत गेला आहे. लावणीने स्वतःला परिस्थितीच्या साच्यात त्याप्रमाणे बसवून घेतलंय. त्याचमुळे लावणी जगली जी महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्वी ज्याप्रमाणे लावणी सादर केली जायची त्याप्रमाणे लावणी आताच्या युगात सादर होणार नाही. काळाप्रमाणे लावणी बदलली आणि बदलती लावणी पाहाण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे असे मत सावित्री यांनी व्यक्त केले.
प्रत्येक नृत्यकलाप्रकार वेगळा आहे. त्यांची तत्त्वे, नियम वेगळी आहेत. त्यामुळे इतर नृत्यकलाप्रकारांची लावणीसोबत तुलना होऊच शकत नाही. लावणीचे व इतर नृत्यकलाप्रकारांचे सौंदर्य वेगवेगळे आहे. या सौंदर्याचा वेगवेगळय़ा पद्धतीनेच आनंद घेतला पाहिजे आणि दाद दिली पाहिजे.









