रवी नाईक यांची मार्मिक टिपण्णी, बेडूक खाण्यापेक्षा चिकन, मटन खाण्याचा सल्ला
प्रतिनिधी/ पणजी
पाऊस सुरू होताच आता बेडकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होणार आहे. राज्यात अनेक प्रकारचे बेडूक आढळतात. मात्र कुणीही त्यांच्या मागे लागू नये. त्यांना खाऊ नये. त्यापेक्षा चिकन मटण खावे, असा सल्ला कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिला आहे.फोंडा येथे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमास उपस्थित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तत्पूर्वी बोलताना बेडकांची शिकार करू नका. त्यापेक्षा चिकन खा, असे सांगितले होते. या वक्तव्यावर नंतर कृषिमंत्री या नात्याने रवी नाईक यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही तोच सल्ला दिला. त्याचबरोबर ‘बेडकांच्या मागे धावू नका’, अशी मार्मिक टिपण्णी केली.
बेडकांची शिकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. बेडूक मारणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे लोकांनी बेडूक मारणे आणि खाणे टाळावे, असे नाईक यांनी सांगितले.
पर्यावरण समतोल राखण्यात बेडकांची महत्त्वपूर्ण भूमिका : सावंत
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे बोलताना, पर्यावरणाचा समतोल राखण्यात बेडूक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी बेडूक वाचले पाहिजेत असे ते म्हणाले. राज्यात विविध भागात वन्यप्रेमी कार्यकर्ते या उभयचर प्रजातीच्या संरक्षणासाठी कार्य करत आहेत. बेडूक जंगलात मानवांना कशा प्रकारे सर्वोत्तम सेवा देतात याबद्दल जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतजमिनीचा समतोल राखण्यासाठी बेडूक महत्त्वाचे आहेत. हे बेडूक जंपिंग चिकन च्या नावाने आमच्या जेवणाच्या ताटात येण्यापेक्षा ते शेतात, जंगलात राहिले पाहिजेत. त्यासाठी आधी ते वाचले पाहिजेत आणि आपण त्यांना वाचवले पाहिजे, त्यामुळे लोकांनी बेडकांची शिकार करण्यापेक्षा चिकन खावे, असे सावंत म्हणाले.
‘जंपिंग चिकन’ साठी होते बेडकांची शिकार

दरम्यान, पावसाळ्यात राज्यातील तमाम रेस्टॉरंट्समध्ये ’जंपिंग चिकन’च्या नावाखाली बेडकांचे शिजवलेले मांस विकण्यात येत आहे. बेडकांची शिकार करण्यास राज्यात बंदी असली तरी तस्करीच्या मार्गाने त्यांची शिकार होतच असते. या चिकनाला प्रचंड मागणी असल्याने तेवढाच प्रचंड भावही मिळत असतो. बेडकांची शिकार होण्याचे तेच प्रमुख कारण आहे.









