एकदा एका जंगलात मोठी गडबड झाली. सगळ्या प्राणी पक्षांची वागणूक बिघडून गेली. गावं जवळ आल्याने प्राणी सगळे बिथरले. माणसासारखं वागताना ताळतंत्र हरवून बसले. उठसूट शिकार करू लागले. भूक नसतांना खाऊ लागले. दंगामस्ती करू लागले. इकडून तिकडे पळत सुटले. कोणाचाच पायपोस कोणाला नव्हता. हे सगळं पाहिल्यानंतर सिंहाने तातडीची सभा बोलावली. सगळ्या प्राण्यांना तंबी दिली ‘जर का कोणी चुकलात तर गाठ माझ्याशी आहे’ असं सांगू लागले. कोणीही रात्री, चित्र विचित्र किंचाळायचं नाही, भूक नसताना शिकार करायची नाही, दुसऱ्याला त्रास होईल असं मुळीच वागायचं नाही. उद्यापासून प्रत्येक प्राण्याला एक दिवसाची सक्तीची सुट्टी. त्या दिवशी कुणीही बाहेर पडायचं नाही आणि आवाज करायचा नाही. हे सगळं ऐकल्यावर, सगळे पक्षी, प्राणी एकदम शांत झाले. त्यांना सिंह महाराजांना उलट उत्तर देता येईना. खरंतर आज तशीही त्यांना शिकार मिळाली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळाल्यामुळे पोटात भूक मात्र जोराची लागली होती. काय करावं कळेना? शेवटी ते सर्व बाहेर निघाले आणि आपल्याला हवी तशी शिकार करून पोटभरून परत घरी आले.
हे पाहिल्यानंतर सिंहाने डरकाळी फोडली आणि परत सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं माणसं प्राण्यासारखे वागले तरी चालतील, पण प्राण्यांनी मात्र माणसासारखं वागायचं नाही. कुणाला त्रास होईल, असं करायचं नाही, कुणाचं ओरबडून घ्यायचं नाही. दुसऱ्याच्या गोष्टी पळवायच्या नाहीत. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं. आपण प्राणी आहोत, याचं भान ठेवायचं आणि पोट भरलेलं असताना शिकार करायची नाही. सगळ्या प्राण्यांना आनंद झाला आणि प्रत्येकाने आपण प्राणी असल्याप्रमाणेच वागू असं आश्वासन सिंहाला दिलं. त्या दिवसापासून प्रत्येकाने मनामध्ये एक अलिखित नियम घालून घेतला. आपण कधीही माणसाचं अनुकरण करायचं नाही. सिंहाला भूक लागल्यानंतर जर शिकार मिळाली नाही तर तो कधी गवत खातो का? हत्तीला खाणं मिळालं नाही तर तो कोणाची शिकार करून खातो का? म्हणजेच देवाने ज्याच्यासाठी जे अन्न ठेवले आहे तेच खायचं, हा अलिखित नियम फक्त देवाच्या घरचाच आपण मान्य करायचा. माणसासारखं दुसऱ्याच्या वाट्याचं काहीही घ्यायचं नाही आणि माणसाचं कधीच अनुकरण करायचं नाही.








