मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
मडगाव: गोव्यात आज प्रत्येक विकासकामाला ‘खो’ घालण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे. विकासकामांबद्दल त्यांच्याकडून अफवा पसरविल्या जात आहेत. विकासकामांना खो घालणाऱ्या घटकांना बळी पडू नका असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव रवींद्र भवनात बोलताना केले. ‘इस्टर’ सणानिमित्त आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक तसेच कार्यक्रमाचे आयेजक अॅण्ड्य्रू फर्नांडिस उपस्थित होते. या पूर्वी कोकण रेल्वेला तसेच मोपा विमानतळाला विरोध करण्यात आला होता. परंतु, जेव्हा हे प्रकल्प मार्गी लागले, तेव्हा त्यांचा सर्वाधिक वापर याच घटकांकडून होत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे बोलताना म्हणाले. कोकण रेल्वे झाल्यास अन्य राज्यातून लोकांना गोव्यात आणले जाणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. परंतु, आज कोकण रेल्वे हा महत्वाचा दुवा बनलेला आहे. कोकण रेल्वेचा वापर आत्ता सर्व घटक करीत आहे. त्याचप्रमाणे मोपा झाल्यास दाबोळी विमानतळ बंद पडणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. परंतु, मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर देखील दाबोळी विमानतळावरील एकही विमान रद्द झालेले नाही याकडे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा
गोव्यातील लोकांमध्ये जाती आणि धार्मिक आधारावर फूट पाडण्यासाठी तिसरी शक्ती प्रयत्नशील आहे. आपण लोकांना जागऊक राहण्याचे आवाहन करतो आणि जात आणि पंथाच्या आधारावर गोव्यात फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन करतो असे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.
कुठल्याच मतदारसंघावर अन्याय नाही
गोव्याचा विकास साध्य करताना आपण काणकोणपासून पेडणेपर्यंत कुठल्याच मतदारसंघावर अन्याय केलेला नाही. विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. तरीसुद्धा विकासकामांना खो घालण्याचा प्रकार होत आहे हा दुर्दैवी प्रकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटन क्षेत्रात राज्यातील लोकांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची मोठी क्षमता आहे, गोव्याला पर्यटनस्थळ म्हणून मिळालेल्या दर्जाचा लाभ लोकांनी घ्यावा. आज पर्यटन क्षेत्रामुळे गोव्याचे नाव सर्वत्र झालेले आहे. हा नावलौकीक आपण सर्वांनी जपला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री ‘गोंयकारपण’ जपतात
भाजप हा पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्टर सणाचे औचित्य साधून दिल्लीत एका चर्चेला भेट दिली व ख्रिश्चन बांधवांना इस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या व्यस्थ कार्यक्रमातून देखील इस्टर सणाच्या कार्यक्रमांसाठी आवर्जुन उपस्थित राहिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच ‘गोंयकारपण’ जपतात असे उद्गार यावेळी दामू नाईक यांनी काढले. कार्यक्रमाच्या सुरवातीला अॅण्ड्यू फर्नांडिस यांनी सर्वांचे स्वागत केले. इस्टर सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात अनेक नामांकित बॅंण्ड सहभागी होऊन त्यांनी आपली कला सादर केली.









