आज फेसबुक हे माध्यम आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. याचा उपयोग लोक स्वत:ची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यासाठी तर करतातच, पण हे एक खरेदी विक्रीचे मोठे माध्यम झाले आहे. अनेक वस्तूंची विक्री आणि खरेदी फेसबुकवरुन केली जात असते. हे सोयीस्कर माध्यम असल्याने अनेक व्यवहारांसाठी त्याचा उपयोग होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
एका व्यक्तीने आपल्या घरातील सोफा विकण्यासाठी फेसबुकवर जाहीरात टाकली. त्याने सोफ्याचे छायाचित्रही पोस्ट केले. त्याने या वस्तूची किंमत 80 हजार रुपये अशी ठेवली होती. सोफ्याचा आकार आणि त्याचा दर्जा पाहता वास्तविक ही किंमत वाजवी होती. तरीही हा सोफा खपला नाही. इतकेच नव्हे, तर तो फुकट दिला तरी आम्हाला नको, असा संदेश अनेकांनी टाकला. लोकांनी असे का केले असेल ? या सोफ्यात असे काय होते की तो खरेदी करण्यास कोणीच पुढे आलेले नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तथापि, त्याचे कारण असे आहे, की, या सोफ्यावर त्या व्यक्तीच्या छोट्या मुलांनी पेनाने अनेक आपल्या चित्रकलेचे प्रदर्शन केले होते. रेघोट्यांच्या स्वरुपातील तो ‘बालकलाविष्कार’ त्या घरात कौतुकाचा विषय असला तरी लोकांना तो पैसे मोजून विकत घ्यावासा वाटला नाही. त्यामुळे आजही सोफा ग्राहकाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीनुसार विनोदी मीम्स पोस्ट केल्या आहेत.









