भूसेनाप्रमुख द्विवेदी यांचे प्रतिपादन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात अप्रत्यक्ष टिप्पणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सेनादलांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे प्रतिपादन भूसेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भूसेना प्रमुखांच्या वक्तव्याच्या संबंधात केलेल्या एका विधानाचा संदर्भ त्यांच्या या मतप्रदर्शनाला आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. चीनने भारताच्या भूमीत अतिक्रमण केले आहे, असे प्रतिपादन भारताच्या भूसेना प्रमुखांनी केले आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेत बोलताना केले होते. हे विधान चांगलेच वादग्रस्त ठरले होते. गांधींच्या या विधानासंदर्भात या मुलाखतीत द्विवेदी यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याचे उत्तर त्यांनी अशा शब्दांमध्ये दिले.
आणखी आरोप
भारत आणि चीन यांच्या सीमाभागातील उताराच्या संदर्भात भारत किंवा चीन यांनी काहीतरी परिवर्तन केले आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी पूर्वी एका पत्रकार परिषदेत केला होता. हा आरोपही भूसेना प्रमुखांनी फेटाळला. आपण एक-दोन दशके मागे गेलो, तर यासंबंधीची स्थिती स्पष्ट होते. 2007 मध्ये चीनसमवेतच्या सीमेवर देखरेख करण्याचे काम इंडो-तिबेटियन दलांकडे होते. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये सीमेचे नियंत्रण भारतीय सेना करीत आहे. वादग्रस्त प्रदेशात आम्ही पुढे सरकलो आहोत, तसेच चीनही काही प्रमाणात पुढे सरकला आहे. सीमेवर जेव्हा सैनिक अधिक संख्येने असतात, तेव्हा त्यांच्या वास्तव्यासाठी सुरक्षित निवासस्थाने निर्माण करावी लागतात. हे कार्य सेना करीत आहे. सैनिकांसाठी वाढीव प्रमाणात वाहतूक व्यवस्था आणि पुरवठा व्यवस्थाही असावी लागते. आता ही व्यवस्था केली जात आहे, अशा अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत.
चीनच्या बांधकामाविषयी…
भारत आणि चीनच्या सीमेलगत चीनने काही खेडी वसविली आहेत. बांधकामे केली आहेत, असे आरोप केले जातात. त्यासंबंधीच्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली. सध्या सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या वास्तव्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. त्यात आश्चर्यकारक किंवा धोकादायक असे काही नाही. सध्या दोन्ही देश अशा प्रकारची बांधकामे आणि सुविधा निर्माण करीत आहेत, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही प्रतिपादन उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे.
संरक्षणमंत्र्यांकडून स्थिती स्पष्ट
मी जे विधान केले होते, त्यासंदर्भात भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्थिती स्पष्ट केली आहे. मी असे विधान मुळात केलेलेच नव्हते, ही बाब राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलेली आहे. संरक्षण विभागानेही यासंदर्भात स्पष्ट माहिती दिली आहे. कोणीही सेनेला राजकारणात खेचण्याचा प्रयत्न करु नये, असे प्रतिपादन करतानाच त्यांनी सीमेवरील परिस्थिती पुन्हा एकदा स्पष्ट केली.
सीमेवरील स्थिती नेमकी काय?
भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर 2021 पासून तणावाचे वातावरण होते. दोन्ही देशांच्या सेना पुढे आलेल्या होत्या आणि एकमेकींच्या डोळ्याला डोळा भिडवून उभ्या होत्या. नंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांमध्ये करार झाला असून त्यानुसार वादग्रस्त बिंदूंवरुन दोन्ही देशांच्या सैन्यांनी माघार घेतली असून 2021 च्या पूर्वीची स्थिती गाठली आहे. त्यामुळे आता फारसा तणाव राहिलेला नाही. तरीही भारताची सेना सतर्क असून सावधपणे सीमारक्षण करीत आहे.









