अदानी मुद्द्यावर सद्गुरुंची टिप्पणी
कोईम्बतूर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सातत्याने सुरू असलेल्या गोंधळादरम्यान सद्गुरु जग्गी वासुदेव यांची टिप्पणी समोर आली आहे. संसदेला युद्धभूमीचे स्वरुप देऊ नका, तेथे चर्चा व्हायला हवी. भारताच्या संसदेत सातत्याने गोंधळ सुरू असल्याचे पाहणे मनाला दु:ख देणारे आहे. विशेषकरून जेव्हा आम्ही पूर्ण जगाला लोकशाहीचा मार्ग दाखवितो आणि आमच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जात असताना हा प्रकार घडणे चुकीचे आहे. भारतात संपत्ती निर्माण करणारे आणि रोजगार पुरविणाऱ्यांना राजकीय संघर्षात ओढले जाऊ नये. उद्योजकांना राजकीय वादविवादाचा हिस्सा केले जाऊ नये असे उद्गार त्यांनी काढले आहेत. कुठल्याही प्रकारचे मतभेद असतील तर ते नियमांच्या कक्षेत राहून सोडविण्यात यावेत. परंतु यावर राजकीय फुटबॉल खेळला जाऊ नये. भारतात उद्योग वाढले अन् बहरले पाहिजेत. भव्य भारत निर्माण करण्याचा हाच एक मार्ग असल्याचे सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी नमूद केले आहे. संसद हे राजकीय चर्चेचे केंद्र आहे. तेथे सर्व मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. परंतु अशाप्रकारे गोंधळ घालून सभागृह स्थगित करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.









