अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचा ओबामांना सल्ला
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताची निंदा करण्याऐवजी त्याचे कौतुक करण्यात स्वत:ची ऊर्जा खर्ची घालावी अशी टिप्पणी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यविषयक अमेरिकन आयोगाच्या माजी आयुक्ताने केली आहे. अमेरिकेतील ख्रिश्चन धर्म प्रचारक जॉनी मूर यांनी भारत हा मानवी इतिहासातील सर्वाधिक विविधता असणारा देश असून अमेरिकेने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे कौतुक करायाल हवे असे म्हटले आहे. अमेरिका हा काही आदर्श नाही, तसेच भारतही हा आदर्श देश असू शकत नाही. परंतु विविधता हीच भारताची शक्ती आहे. अमेरिका भारताकडून बरेच काही शिकू शकतो. भारत पूर्ण जगात सर्वाधिक विविधता असणारा देश आहे. धर्माबद्दल जाणून घेण्यासाठी मी भारतातच गेलो होतो. तेथील लोकशाहीत अधिक भाषा, अधिक धर्म आणि अधिक वैविध्यपूर्ण लोक असून हे अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मूर म्हणाले. अनेक लोक भारताबाहेरून भारताबद्दल विचार व्यक्त करत असल्याचे माझे मानणे आहे. जर तुम्ही भारतात असता तर देशाचे वैविध्य हेच त्याचे सामर्थ्य असल्याचे तुम्हाला कळले असते. भारतात मी धर्मशाळा येथे तिबेटी समुदायासोबत वेळ घालविला आहे. अमृतसर येथे शिख समुदायासोबत चर्चा केली आहे. तेथील ख्रिश्चन समुदायाला चांगल्याप्रकारे ओळखतो असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
बराक ओबामांची टिप्पणी
बराक ओबामा यांनी काही दिवसांपूर्वी जो बिडेन यांनी भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करावा असे म्हटले होते. भारत वांशिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करत नसल्यास फुटिरतेचे आवाज उपस्थित होऊ शकतात असे ओबामा यांनी केले होते.









