केरळ उच्च न्यायालयाने त्रावणकोर देवस्थान मंडळाला फटकारले
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी मंदिरांमध्ये फ्लेक्स बोर्डाद्वारे राजकीय संदेश देण्याप्रकरणी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. मंदिरांमध्ये राज्य सरकार किंवा त्रावणकोर देवस्थान मंडळाला शुभेच्छा देणारे फ्लेक्स बोर्ड्स लावण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. भाविक तेथे देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, मुख्यमंत्री, आमदार किंवा देवस्थान मंडळाच्या सदस्यांचा चेहरा पाहण्यासाठी नाही अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
एका प्रकरणी सुनावणी करताता न्यायाधीश अनिल नरेंद्रन आणि मुरली कृष्णा एस. यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे. अलपुझ्झा जिल्ह्यातील चेरथालानजीक थुरावूर महाक्षेत्रम मंदिरात फ्लेक्स बोर्ड झळकविल्यायच विरोधात एक तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी सुरू केली होती.
फ्लेक्स बोर्ड, ज्यात मुख्यमंत्री पिनाराई विजयन, राज्याचे देवस्थानविषयक मंत्री व्ही.एन. वसावन, देवस्थान मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदाराचे छायाच्रि‰ होते, या फ्लेक्स बोर्डाद्वारे मंदलकला-मकराविलक्कु तीर्थयात्रेदरम्यान शबरीमला तीर्थात आनंदमची अनुमती देण्यासाठी आभार मानण्यात आले होते.
अशाप्रकारच्या फ्लेक्स बोर्डांना अनुमती दिली जाऊ शकत नाही. तुम्ही (त्रावणकोर देवस्थान मंडळ) मंदिरांचे मालक आहात अशी धारणा बाळगू नका. देवस्थान मंडळ एक विश्वस्त असून ते केवळ मंदिरांच्या व्यवस्थापनाचे काम हाताळते. भाविक मंदिरांमध्ये देवाचे दर्शन घेण्यासाठी जातात, मुख्यमंत्री, आमदार आणि देवस्थान मंडळाच्या सदस्यांचे चेहरे पाहण्यासाठी भाविक तेथे आलेले नसतात अशा शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.
थुरावुर मंदिर शबरीमला तीर्थयात्रेदरम्यान एदाथवलम (विश्रांतीचे ठिकाण) आहे. याचमुळे तीर्थयात्रेदरम्यान भाविकांना सुविधा पुरविणे ही देवस्थान मंडळाची जबाबदारी आहे. फ्लेक्स बोर्ड झळकविणे हे मंदिराच्या सल्लागार समितीचे काम नाही. भाविकांकडून मिळालेला निधी अशा कामाकरता खर्च केला जाऊ नये असे खंडपीठाने म्हटले आहे. दोन्ही न्यायाधीशांनी याप्रकरणी त्रावणकोर देवस्थान मंडळ आणि अन्य संबंधित प्राधिकरणांकडून स्पष्टीकरण मागविले आहे. त्रावणकोर देवस्थान मंडळाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्ड्सची माहिती खंडपीठाने मागितली आहे.









