अमेरिकेच्या तज्ञांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारत आणि अमेरिकेदरम्या सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेल्या भरभक्कम आयातशुल्कामुळे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा ठप्प झाली आहे. याचदरम्यान जो बिडेन यांच्या प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले जेक सुलिवन आणि माजी उपविदेश मंत्री कर्ट एम. कॅम्पबेल यांनी ट्रम्प प्रशासनाला इशारा दिला आहे. वर्तमान स्थिती कायम राहिल्यास अमेरिका एक महत्त्वपूर्ण रणनीतिक भागीदार गमावू शकतो, आणि चीनला नवोन्मेषाच्या क्षेत्रात आघाडी मिळू शकते. भारताची तुलना पाकिस्तानसोबत केली जाऊ नये, कारण भारत त्याच्याहून खूपच अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे या दोन्ही तज्ञांनी म्हटले आहे.
फॉरेन अफेयर्स नियतकालिकात लिहिलेल्या स्वत:च्या संयुक्त संपादकीयात सुलिवन आणि कॅम्पबेल यांनी भारत-अमेरिका भागीदारीला दीर्घकाळापासून द्विपक्षीय समर्थन मिळाले असून या संबंधाने हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या ‘बेजबाबदार आक्रमकते’ला हतोत्साहित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे नमूद केले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्या नाट्यामय वक्तव्यांमध्ये अनेकदा एखाद्या सौदेबाजीची भूमिका असते असे अमेरिकेच्या सहकाऱ्यांनी भारताला समजावे असे लेखात म्हटले गेले आहे.
भारताला प्रतिस्पर्धकांकडे ढकलण्याचा धोका
ट्रम्प प्रशासनाची धोरणे 50 टक्क्यांपर्यंत आयातशुल्क, रशियाकडून कच्चे तेल खरेदी आणि पाकिस्तानविषयी वाढत्या तणावामुळे अमेरिका-भारत संबंध बिघडले आहेत. शांघाय सहकार्य परिषदेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष जी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेली चर्चा पाहता वर्तमान स्थिती कायम राहिल्यास अमेरिका भारताला स्वत:च्या प्रतिस्पर्धांच्या गोटात ढकलेल असा इशारा दोन्ही माजी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
पाकिस्तान धोरणाला भारताशी जोडू नका
अमेरिकेने स्वत:च्या विदेश धोरणात ‘भारत-पाकिस्तान’ची एकत्र तुलना करण्याची गल्लत करू नये असा सल्ला सुलिवन आणि कॅम्पबेल यांनी दिला आहे. पाकिस्तानबाबत दहशतवादाचा सामना करणे आणि अण्वस्त्र प्रसार रोखण्यासारख्या महत्त्वाच्या चिंता आहेत, परंतु त्या भारताशी जोडलेल्या बहुआयामी आणि दीर्घकालीन हितसंबधांच्या तुलनेत कमी महत्त्व राखून असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अमेरिका-पाकिस्तानात जवळीक
ट्रम्प यांनी अलिकडेच भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता, तर भारताने ट्रम्प यांची याप्रकरणी कोणतीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांचे व्हाइट हाउसमध्ये स्वागत करण्यात आले आणि अमेरिकेने पाकिस्तानला व्यापार, आर्थिक विकास आणि क्रिप्टोकरेन्सी सहकार्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी अमेरिकेने पाकिस्तानसोबत कच्चे तेल साठे शोधण्याच्या कराराची घोषणा केली तसेच त्याचवेळी भारतीय उत्पादनांवर 25 टक्क्यांचे अतिरिक्त आयातशुल्क लादले होते.
नव्या रणनीतिक कराराचा प्रस्ताव
भारत-अमेरिकेदरम्यान नवी रणनीतिक भागीदारी एका कराराच्या स्वरुपात व्हावी, ज्याला अमेरिकेच्या सिनेटची मंजुरी मिळावी. हा करार 5 प्रमुख स्तंभांवर आधारित असेल आणि याचे लक्ष्य दोन्ही देशांची सुरक्षा, समृद्धी आणि संयुक्त मूल्यांना मजबूत करणे असेल असा दावा सुलिबेल आणि कॅम्पबेल यांनी केला आहे.
तांत्रिक भागीदारीवर जोर
भारत आणि अमेरिकेने 10 वर्षीय कार्ययोजनेवर सहमत व्हावे, ज्यात कृत्रिम प्रज्ञा (एआय), सेमीकंडक्टर, जैवतंत्रज्ञान, क्वांटम, स्वच्छ ऊर्जा, दुरसंचार आणि एअरोस्पेस यासारख्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक भागीदारी सामील असावी. दोन्ही देशांना प्रमोट अजेंडा (संयुक्त गुंतवणूक, संशोधन आणि विकास, प्रतिभा भागीदारी) आणि प्रोटेक्ट अजेंडा (निर्यात नियंत्रण आणि सायबर सुरक्षा सहकार्य) मिळून काम करावे लागेल असे संपादकीयात म्हटले गेले आहे.









