युवा समितीची शिक्षण विभागाकडे मागणी : शाळा विलीनीकरणामुळे खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
बेळगाव ; खानापूर तालुका हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथे छोट्या खेड्यांमध्ये वाडी वस्त्यांवर शाळा भरविल्या जातात. लोकसंख्या कमी असल्याने शाळांच्या पटसंख्याही कमी आहेत. परंतु त्यामुळे ज्या शाळांच्या पटसंख्या कमी आहेत. त्या शाळा इतर शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्यामुळे पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करू नये, या मागणीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
विलीनीकरणाचा निर्णय राज्य सरकारचा
एखाद्या शाळेची पटसंख्या 15 पेक्षा कमी असेल तर त्या शाळा बंद करून इतर शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या 64, कन्नड माध्यमाचे 5 तर उर्दु माध्यमाच्या 7 शाळा इतर शाळांमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहेत. खानापूर तालुक्यातील बऱ्याचशा शाळा या वाडी वस्त्यांवर असल्याने तेथील पटसंख्या कमी आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय या तालुक्यासाठी योग्य ठरणारा नाही, असे झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
खानापूर तालुक्यासाठी नियम नको
शाळा बंद करून इतर शाळांमध्ये विलीनीकरण झाल्यास त्या गावापर्यंत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी जोखमीचे आहे. दुर्गम भाग असल्याने जंगली प्राण्यांचा वावर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. विलीनीकरण झाल्यास पालकांना आपल्या पाल्याला दुसऱ्या गावच्या शाळेपर्यंत सोडावे लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत शिक्षण विभागाने विचार करून हा नियम खानापूर तालुक्याला लावू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी तसेच राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनाही करण्यात आली आहे. शिक्षण विभागातील सहाय्यक अधिकारी आर. टी. मुद्दण्णावर व अधिक्षक सतिश दुडगुंडीमठ यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, सिद्धार्थ चौगुले, तालुका प्रमुख मनोहर हुंदरे, संतोष कृष्णाचे, राजू कदम, विनायक कावळे, रोहन पुंडेकर, सुरज कुडूचकर, निखील देसाई, अभिजीत काकतीकर, आनंद पाटील, बापू भडांगे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









