पशुसंगोपन खात्याचे आवाहन : चिकनला कोणताही धोका नसल्याची माहिती
बेळगाव : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यू आढळून आला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. मात्र जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबतचे एकही प्रकरण आढळून आले नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यातील काही भागांमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील 9 ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारून नजर ठेवली जात आहे. शिवाय यापूर्वीच सर्व पक्ष्यांना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक, चिकन विक्रेते आणि खवय्यांनीदेखील मनात कोणतीही भीती ठेवू नये, असे आवाहन खात्याने केले आहे.
बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र राज्याला लागून असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बेळगाव, कागवाड, निपाणी, हुक्केरी, संकेश्वर, खानापूर आदी ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारून कोंबड्या आणि अंड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. राज्यात आणि बेळगाव जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबतचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोंबड्यांमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणे दिसून आल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. सध्या वाढता उष्मा आणि बर्ड फ्ल्यूबाबतच्या अफवांमुळे चिकनच्या दरात घसरण झाली आहे. 230 वरून चिकनचा दर प्रतिकिलो 160 रुपयांवर आला आहे. मात्र कोंबड्या आणि चिकनला कोणताही धोका नसून खवय्यांनी भीती बाळगू नये.









