प्रा. डॉ. एस. रोहितराज यांचे प्रतिपादन : साऊथ कोकण एम्पॉवरमेंट चॅरिटेबल फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर ध्येय बाळगले पाहिजे. ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रत्येक दिवशी सकारात्मक पाऊल टाकणे आवश्यक आहे. मनातील न्युनगंड बाजूला ठेवून स्वत:ची ताकद या वयातच ओळखता येते. आपले पालक आपल्याकडून विशेष अपेक्षा ठेवत नसतात. आपल्या मुलाला चांगले यश मिळू दे, ही एकच अपेक्षा त्यांच्या मनामध्ये असते. या यशाने ते खूश होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून न जाता धैर्याने यशाचा मार्ग निवडावा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. एस. रोहितराज यांनी केले. साऊथ कोकण एम्पॉवरमेंट चॅरिटेबल फौंडेशनच्यावतीने पीयूसी द्वितीय वर्षात सर्वाधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. सचिन पवार, कर्नल चंद्रनील रामनाथकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू, सेक्रेटरी मधुकर सामंत, मदन कलबुर्गी, प्राचार्य एस. एन. देसाई उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते आरएलएस कॉलेजचा विद्यार्थी कृष्णा मुरकुटे, गोगटे कॉलेजची विद्यार्थिनी कृपा जाधव यांचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. साऊथ कोकण एम्पॉवरमेंट चॅरिटेबल फौंडेशनवतीने आरपीडी व जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रुस्तुम रतनजी उर्फ गोलखारी पारितोषिक अवंती कणगुटकर, वैष्णवी मुटणगी, रक्षिता तळेगाव, सृष्टी पाटील यांना देण्यात आले. या व्यतिरिक्त पैकीच्या पैकी गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. कर्नल रामनाथकर व प्रभू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. रेश्मा सप्ले यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन कीर्ती फडके, शुभदा मंगोळी, साक्षी कुलकर्णी यांनी केले. प्रा. नितीन भातकांडे यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.









