चिपळुणात वृक्षारोपणप्रसंगी नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांचे आवाहन
प्रतिनिधी/ चिपळूण
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे काहीवेळा नुसते इव्हेंट होतात. पुढे लावलेल्या झाडांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे तसे न करता भविष्यात वृक्षारोपणाबरोबरच लागवड केलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली तरच पर्यावरणपूरक कार्यक्रम यशस्वी होतील. येथे करण्यात आलेल्या गाळ उपशानंतर पावसाळय़ात आपली खरी परीक्षा असून त्यामध्ये आपण उत्तीर्ण होऊ, असा विश्वास अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शहरातून वाहणाऱया साडेसात कि.मी.लांबीच्या शिवनदीत नाम फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आलेल्या गाळ उपशाच्या पाहणीसाठी आलेल्या अनासपुरे यांनी बुधवारी गाळ उपशाची पाहणी करून अधिकाऱयांकडून आढावा घेतला. यानंतर शिवनदी किनारी चिपळूण नगर परिषद, नाम फाउंडेशन व श्रमिक पत्रकार संघ चिपळूणतर्फे वृक्षारोपण केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आजचा वृक्षारोपण कार्यक्रम आवडला. याबद्दल चिपळूण नगर परिषदेचे अभिनंदन करावेसे वाटते. शिवाय ज्यांची शेती आहे, ते शेतकरी स्वतःहून वृक्षारोपणासाठी उपस्थित राहिले असून विशेष म्हणजे त्यांनी झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही घेतली आहे. झाडांची निवड योग्य आहे. देशी पर्यावरणपूरक झाडे आहेत. या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी पुढील पिढीवर असल्याने येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षकांना विनंती असेल की, पहिली ते महाविद्यालयीन प्रत्येक विद्यार्थ्यावर प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी दिली पाहिजे. हिच भविष्यात उपलब्धी ठरेल. हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवला गेला तर एक मोठे पर्यावरणपूरक काम होईल. विद्यार्थ्यांनी झाडांच्या संगोपनासाठी घरातून दोन बाटल्या आणताना एक बाटली स्वतःसाठी तर दुसरी बाटली झाडांसाठी असे प्रेम वाटून घेतले तर पर्यावरणपूरक वाटचाल यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
आम्ही कोणताही गाजावाजा न करता काम करणारी मंडळी आहोत. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे चिपळूणचे मोठे नुकसान झाले. आपण सर्वजण मिळून आपत्तीला तोंड देऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून शिवनदीतील गाळ काढला आहे. यात आपण किती यशस्वीपणे काम केले आहे, हे पावसाळय़ात समजेल. श्रेयवादाची लढाई लढण्यापेक्षा चांगल्या कामात सर्वांचा हातभार लागलेला असतो. सर्वांनी मिळून काम केले असते, हे महत्वाचे आहे. यश-अपयश हे महत्वाचे नाही. मात्र, प्रयत्न करणे आवश्यक आहे. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला उद्योजक, कंपन्या यांनी सीएसआरमधून निधी उपलब्ध करून दिला तर या ठिकाणी मोठे काम होईल. पर्यावरणपूरक कार्यक्रमाबरोबरच शहरात कचरा निर्मूलनासाठी नाशिकच्या धरतीवर नैसर्गिक खत प्रकल्प उभारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सूचवले.
यावेळी नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात, समीर जानवलकर, चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, महेंद्र कासेकर, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. प्रसाद शिंगटे व पत्रकार उपस्थित होते.









