स्मार्ट सिटीच्या कामांबाबत लोकांची प्रतिक्रिया : अभियंत्यांच्या बेजबाबदारपणावर जनतेत रोष
पणजी : राजधानीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल आजपर्यंत बरीच टीका, आरोप करण्यात आले होते, परंतु रायबंदर येथे एका कामगाराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्यावरून लोकांनी ही कामे पाहणाऱ्या अभियंत्यांवर टीकेची झोड उठविली असून हे खरेखुरे प्रशिक्षित पदवीधर अभियंते आहेत की वशिल्याने खोगीरभरती केलेले अडाणी आहेत? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी देशाटन करणाऱ्या निष्पाप कामगारांवर बेजबाबदार अभियंत्यांमुळे हकनाक जीव गमावण्याची पाळी येणे हे कंत्राटदार कंपनीस माणुसकी नसल्याचे उदाहरण आहे. त्यामुळे अशा कंपन्या आणि अभियंते, पर्यवेक्षक यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. रायबंदर येथे सोमवारी सकाळी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू असताना एका ख•dयात उतरलेल्या कामगारावर मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर राज्यभरातून संतप्त भावना व्यक्त झाल्या आहेत.
… तर हे ‘अभियंते’ कसले?
राज्याची आणि पर्यायाने आपण काम हाती घेतलेल्या संबंधित परिसराची कोणतीही भूगर्भशास्त्रीय माहिती नसलेल्या अभियंत्यांना अशाप्रकारच्या धोकादायक कामांवर नियुक्त करणे हीच मुळाच कंत्राटदाराची मोठी चूक आहे. समुद्रकिनारी असलेला रायबंदर हा भाग डोंगराच्या पायथ्यावर वसलेला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी या डोंगराच्या तळाशी बरेच आतपर्यंत पसरलेले आहे. अशा भागात कोणतेही काम आणि खास करून खोदकाम हाती घेताना कंत्राटदाराने सुरक्षेच्या उपाययोजनांना सर्वाधिक प्राधान्य देणे क्रमप्राप्त असते. परंतु अशी कामे करताना स्थानिकांना कितीही त्रास झाले तरी चालतील, किंवा एखाद्या निष्पापाचा बळी गेला तरी हरकत नाही, ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिले पास करून घेता येतात’, ही मानसिकता बळावू लागल्याने ‘सुरक्षा’ हा विषयच खुंटीला टांगून कंत्राटदार कामे करत असतात.
घडलेल्या घटनांमधून बोध कोण घेणार?
अशाच मानसिकतेतून यापूर्वी शहरात अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारतींवर पत्र्यांचे छप्पर वगैरे बसविण्यासाठी विनासुरक्षा काम करणारे अनेकजण वरून पडून गतप्राण झालेले आहेत. बड्या प्रकल्पांची कामे चालताना क्रेन कोसळून एकाच दिवशी दोघांचा मृत्यू होण्याची घटनाही घडलेली आहे. एका ठिकाणी पुलाचे काम सुरू असताना सज्जा कोसळून कित्येक कामगार थेट नदीत पडून ठार झालेले आहेत. अशा कित्येक दुर्घटना राज्याच्या इतिहासात नोंद आहेत. मात्र त्यातून कोणताही बोध न घेता त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत आहेत.
दूरदूरहून येतात पोटाची खळगी भरण्यासाठी…
प्रकल्पांमध्ये काम करणारे कामगार हे अत्यंत गरीब असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी दूरदूरच्या राज्यांमधून आलेले असतात. काहींना तेवढ्याच कामासाठी स्वत: कंत्राटदाराने आणलेले असतात. अशावेळी त्यांच्यातील एखाद्याचा बळी गेला तरी त्याचे कुणाला सोयरसुतक नसते. त्याच्या मृतदेहासोबत पाच-पन्नास हजार ऊपये कुटुंबीयांच्या हाती टेकवले जातात. गरीबी पाचवीला पूजलेल्या त्या कुटुंबीयांसाठी ते 50 हजार ऊपये सुद्धा लाखमोलाचे वाटतात. त्यामुळे ते गप्प राहतात. परिणामी कंत्राटदारांचे फावते व ते आणखी निष्पापांचे बळी घेण्यास निर्ढावतात. रायबंदर येथे घडलेल्या घटनेमुळे एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे. यावेळी पोलिसांनी गंभीर दखल घेताना सदर कंत्राटदारावर गुन्हा नोंद करून दोघांना अटकही केली आहे. कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता त्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अधिकाऱ्याच्या मुसक्या कधी आवळणार
मुळात ही स्मार्ट सिटीची कामे म्हणजेच एक महाघोटाळा आहे, असा ठपका वारंवार ठेवण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या निधीत यापूर्वी कोट्यावधींची उधळपट्टी करणारा वादग्रस्त अधिकारी निर्धास्तपणे वावरत आहे. खरे तर सर्वात आधी त्याच्या मुसक्या आवळण्याची गरज होती. परंतु त्याला अटक केल्यास अनेक बडी धेंडे रडारवर येतील या भीतीपोटी त्याला हात लावण्याची हिंमत कुणाला होत नाही, असा आरोपही यापूर्वी विरोधकांमधून झालेला आहे.
अंतपार नसलेली स्मार्ट कामे
राजधानीतील स्मार्ट कामे तर जशी काही संपण्याचे नावच घेत नाहीत. केवळ चार महिन्यांपूर्वी जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर चकाचक हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते पुन्हा खोदण्यास प्रारंभ झाला आहे. ही विकासकामे म्हणजे स्मार्टनेसच्या नावाखाली चाललेली अंतपार नसलेली भ्रष्टाचाराची जशी काही मालिकाच सुरू असल्याचे लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे ‘सिटी स्मार्ट होईल तेव्हा होईल’, सध्यातरी लोकांना जबरी त्रास सहन करावे लागत आहेत, आणि तेच सत्य आहे.









