शांतता बैठकीत निर्णय
व़ार्ताहर /कडोली
वाईट गोष्टीना थारा न देता एखाद्दा गोष्टीपासून कोणत्याही समाजाला त्रास होईल अशी कृती एकमेकाकडून घडू न देण्याचा ऐतिहासिक निर्णय कडोली येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू-मुस्लीम समाजाच्या शांतता बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील हेते. शांतता बैठकीत मार्गदर्शन करताना एसीपी गंगाधर हिरेमठ म्हणाले की, गेल्या चार दिवसापूर्वी घडलेल्या ‘त्या’ घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी साक्षीदारांनी महत्त्वाची भूमिका निभावणे गरजेचे आहे. सदर घटना हाताळण्यासाठी नागरिकांनी संयम बाळगून पोलिसांना सहकार्य केले, याबद्दल कौतुक केले. शिवाय कोणतीही विपरित घटना घडल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसाना कळवावे. पोलीस त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील.
शांतता बैठकीत काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश एम., तहसीलदार बसवराज नागराळ, मारिहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्यानशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले.गावात वाईट गोष्टी घडविणाऱ्या व्यक्तीना थारा देऊ नये, ग्रामदैवत श्री कल्मेश्वर देवालयाच्या सोमवार या वारादिवशी मांसाहाराला मज्जाव करावा, कोणत्याही समाजाला त्रास होईल असा आवाज प्रार्थना स्थळावरून होऊ नये, रात्री उशिरापर्यंत कठड्यावर बसून राहणाऱ्या तरुणावर नजर ठेवणे, दोन्ही समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमप्रसंगी डॉल्बीचा अथवा कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी. अशा प्रकारचे निर्णय हिंन्दू-मुस्लीम समाजातर्फे घेण्यात आले. यावेळी शिवाजी कुट्रे, उदय सिद्दणावर, मकसूद पठाण, आप्पया देसाई, हारूण मजिद ताशिलदार, ग्राम. पं. अध्यक्ष सागर पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. बैठकीला ग्रा. पं. सदस्या, हिंदू-मुस्लीम समाजाचे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









