कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या मुद्यावरून जिह्यातील राजकारणास उकळी फुटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावरून अरुण डोंगळे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मंगळवारी फडणवीस व शिंदे यांच्यासोबत गोकुळच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर राजीनाम्याचा मुद्दा निकाली निघणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत डेंगळे राजीनामा देण्याची शक्यता आहे. शशिकांत पाटील–चुयेकर यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवरून असून ते नाव सर्वमान्य असेल असा नेत्यांचा विश्वास आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष नियुक्तीसाठी गोकुळ प्रशासनाकडून गुरुवारी नोटीस काढली जाण्याची शक्यता आहे.
अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी नकार दिल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून उलटसुलट राजकीय चर्चा सुरु आहेत. या चर्चेला पुर्णविराम देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आघाडी घेत रविवारी एका खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी डोंगळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी डोंगळे यांनी गोकुळच्या सर्व नेत्यांसह आपण एकत्रितरित्या मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करूया. त्यानंतर राजीनामा देण्यास माझी कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी मुश्रीफ यांना सांगितले. त्यानुसार डोंगळे यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक होणार आहे. त्यानंतरच डोंगळे अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहेत. सोमवारी दुपारी डोंगळे मुंबईकडे रवाना झाले.
- अध्यक्ष पद घेण्यासाठी विश्वास पाटील यांचा नकार
दरम्यान डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना पुन्हा अध्यक्ष पदाची संधी दिली जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण विश्वास पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्या गटातील असल्यामुळे त्यांच्या नावाला महायुतीमधील काही नेत्यांच्या माध्यमातून अंतर्गत पातळीवरून विरोध केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी पुन्हा अध्यक्ष पद घेण्यास नकार दिला असल्याचे समजते. सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून नेत्यांनी शशिकांत पाटील–चुयेकर यांचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित केले असल्याचे समजते.
- जि.प.सदस्य पदाचा डोंगळेंना मुश्रीफांनी दिला शब्द
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यापूर्वी मंत्री मुश्रीफ यांच्याकडून एक शब्द घेतला असल्याचे समजते. डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक डोंगळे यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषदेत पाठविण्याचा शब्द त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडून घेतला असल्याची चर्चा आहे. महायुतीमधील कोणत्याही घटक पक्षातून निवडणूक लढविली तरीही अभिषेक यांना विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचा शब्द मुश्रीफ यांनी दिला आहे.
- गोकुळचा महानंदा होऊ नये…!
सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या ताकदीवर गोकुळ संघ उभारला आहे. त्याच्या कारभारात अलिकडे राज्यपातळीवरील नेत्यांचा हस्तक्षेप वाढल्याचे चित्र आहे. असाच हस्तक्षेप वाढलेल्या राज्यातील महानंदा दूध संघाचे काय झाले ? हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे गोकुळचा महानंदा होऊ नये अशा भावना दूध उत्पादकांसह कर्मचारी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.








