केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली अनुमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या गटाला देणग्या स्वीकारण्याची अनुमती दिली आहे. लोकांकडून देणगी प्राप्त करण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने जनतेकडून देणगी मिळविण्याकरता पक्षाच्या दर्जाविषयक प्रमाणपत्र जारी करावे अशी मागणी आयोगाकडे केली आहे.
व्यक्ती किंवा कंपन्यांकडून स्वेच्छेने कुठल्याही रकमेची देणगी स्वीकारण्यास आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला अनुमती दिली आहे. शासकीय कंपनीकडून मात्र देणगी स्वीकारता येणार नाही. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या संबंधित तरतुदींच्या अंतर्गत आयोगाने शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला देणगी स्वीकारण्याची अनुमती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यीय शिष्टमंडळाने सोमवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
मागील वर्षी जुलै महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्याच्या निवडणूकचिन्हावर दावा केला होता. याकरता या गटाने महाराष्ट्र विधानसभेतील पक्षाच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्याचा युक्तिवाद केला होता. आयोगाने अजित पवार यांच्या गटाचा हा दावा मान्य करत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे नाव निवडण्याची सूचना केली होती.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते, यातील 8 जागा या गटाने जिंकल्या होत्या. तर अजित पवार यांच्या गटाने 5 जागा लढविल्या होत्या आणि यातील केवळ एकच जागा जिंकता आली होती.









