दुसऱया मजल्याची कॉलमभरणी उत्साहात : सढळ हस्ते मदतीचे आवाहन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
‘माझी शाळा आणि मी या शाळेचा’ हे घोषवाक्य उराशी बाळगून शासकीय मदत, माजी विद्यार्थी व इतर देणगीदारांच्या आर्थिक मदतीतून कंग्राळी बुदुक येथील मराठी प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे बांधकाम जोरात सुरू आहे. रविवारी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या गवळी संघटनेने दुसऱया मजल्याच्या कॉलमभरणीचा कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व रिअल इस्टेट एजंट कल्लाप्पा तवनाप्पा पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी जयराम पावशे यांची सुकन्या रेश्मा पावशे, माजी विद्यार्थी लक्ष्मण हुरुडे, प्रवीण पाटील, सूरज पाटील, श्रीनिवास चिखलकर, दिनेश कोळी, मनोज पाटील उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रेश्मा पावशे हिच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाळा बांधकाम कमिटीच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रास्ताविकमध्ये बांधकाम कमिटीचे सदस्य सदानंद चव्हाण यांनी गवळी संघटनेच्या माजी विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. ‘माझी शाळा आणि मी या शाळेचा’ हे घोषवाक्य प्रत्येक माजी विद्यार्थ्याने लक्षात ठेवून मराठी भाषा व शाळा वाढविणे ही जिद्द कायम ठेऊन सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले. माजी विद्यार्थी लक्ष्मण हुरुडे, कल्लाप्पा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थिनी रेश्मा पावशे हिने शाळा बांधकामासाठी 2121 रुपये देणगी दिली. यावेळी इतरही दानशूरांनी देणग्या दिल्या. त्यामध्ये मल्लाप्पा व कल्लाप्पा तवनाप्पा पाटील या भावांकडून 25,000 रुपये, जयराम पावशे, सूरज पाटील यांच्याकडून प्रत्येकी 5151 रुपये, लक्ष्मण हुरुडे 5051 रु., प्रवीण पाटील, नागेश पवार, श्रीनिवास चिखलकर प्रत्येकी 5000 रुपये, दिनेश कोळी, मनोज पाटील प्रत्येकी 1100 रुपये.
यावेळी दत्ता पाटील, ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भदरगडे, परशराम बसरीकट्टी, गजानन पवार, सागर भेकणे, गोपाळ पाटील, मल्लाप्पा पाटील, संदीप कोळी, बाळू कोनेरी, बाळू पाटील, मनोज चव्हाण, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. बांधकाम कमिटीचे सदस्य राजू मन्नोळकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









