वार्ताहर /खोल
चार रस्ता, काणकोण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीचा शुभारंभ मंडळाच्या मंडपात झाला. संस्थापक अध्यक्ष अजय भगत यांनी 33 वर्षांपूर्वी चार रस्ता येथे काही सभासदांच्या सहकार्याने या मंडळाची सुरुवात केली होती. आज या मंडळाची गणना प्रमुख गणेशोत्सव मंडळांमध्ये होत असून त्यांचे कार्य व ख्याती अशीच वाढत जावो, अशी भावना प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली यावेळी उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, नगरसेवक सायमन रिबेलो व हेमंत ना. गावकर यांनीही गणेशोत्सव मंडळास शुभेच्छा व्यक्त केल्या. या समारंभाला सेंत्रु प्रोमोतोर द इस्रुसांव शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय भगत व मंडळाचे अध्यक्ष कुशवंत भगत उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व पारंपरिक समई प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन मनोज ना. गावकर यांनी केले.









