कराड :
कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिरात सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने नदीकडील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. मंदिरातील अन्य दोन दरवाजांची कुलूपे तोडून दानपेटी फोडून किरकोळ रक्कम घेऊन चोरटा पसार झाला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केदार आवटे या पुजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना फोन केला. रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी तातडीने मंदिराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी कराड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. मात्र चोरीशी त्यांचा संबध आहे का? हे निष्पन्न झालेले नाही. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराडच्या कृष्णा घाटावर कृष्णामाई मंदिरासह अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये दररोज पहाटे पूजाअर्चा होत असते. रात्री दहानंतर मंदिर कुलूपे लावून दरवाजे बंद केले जाते. सोमवारी 17 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एका चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न फसला. यानंतर चोरट्याने नदीकडील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. आतील दानपेटी लोखंडाच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मंदिरात देवीकडे जाण्याच्या मार्गावर असलेल्या दोन्ही दरवाजाची कुलूपे तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. आतील ओवाळणीच्या ताटातील काही रकमेसह दानपेटीतील रक्कम चोरट्याने पळवली.
सोमवारी पहाटे केदार आवटे हे मंदिरात आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना हा प्रकार सांगितला. यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अनिल स्वामी तातडीने मंदिराकडे आले. पहाटेच त्यांनी पाहणी करून चोरट्याच्या हालचालींवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर यांच्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्याकडे चौकशी सुरू असून त्यांनीच चोरी केली आहे का? याची खात्री करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, या परिसरातील आणखी एका मंदिराचा चोरीचा प्रयत्न झाला आहे. प्रीतिसंगम बागेसमोरच्या रस्त्यावर खाद्य पदार्थांचे गाडे असून या ठिकाणीही वारंवार भुरट्या चोऱ्या होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.








