40 वर्षांत प्रथमच खुल्या मैदानात होणार नाही : अतिथंडी व हिमवादळामुळे निर्णय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोमवार, 20 जानेवारी रोजी अमेरिकन कॅपिटल हिलमध्ये (संसद) होईल. गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी समारंभ संसदेत म्हणजेच ‘इनडोअर’ होणार आहे. यापूर्वी शपथविधीचे आयोजन मोकळ्या जागेत केले जात होते. सध्या अमेरिकेत हिमवादळाचा जोरदार तडाखा सुरू आहे. साहजिकच हिमवर्षाव व कडाक्याच्या थंडीमुळे शपथविधी मोकळ्या जागेवर न घेता सभागृहमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीदरम्यान तापमान उणे 7 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी शपथ घेतील. यापूर्वी, त्यांनी 2017 ते 2021 दरम्यान 45 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा इमारतीच्या आत व्हावा यासाठी कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली होती. अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) सदस्यांनाही याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेतील अनेक राज्ये सध्या तीव्र थंड वाऱ्यांशी झुंजत आहेत. ध्रुवीय भोवरा हे याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. ध्रुवीय भोवऱ्यात वारे विरुद्ध दिशेने वाहतात. भौगोलिक रचनेमुळे ध्रुवीय भोवरा सहसा उत्तर ध्रुवाभोवती फिरतो. ही स्थिती दक्षिणेकडे पोहोचत असताना अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये तीव्र थंडी पसरते.
मुकेश अंबानी दाम्पत्याचीही उपस्थिती
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. तसेच क्वाड देशांचे परराष्ट्रमंत्री देखील उपस्थित राहतील. तसेच देश-विदेशातील अनेक धनाढ्या आणि मान्यवरांनाही अमेरिकेने आमंत्रित केले आहे. त्यानुसार अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्यासह जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि सॅम ऑल्टमन उपस्थित राहू शकतात.









