युद्धविरामावर चर्चा : भारत-पाक संघर्षाचा पुन्हा उल्लेख
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कंबोडिया आणि थायलंड यांच्यात सुरू झालेल्या संघर्षात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली आहे. दोन्ही देशातील संघर्ष थांबविण्यासाठी त्यांनी मध्यस्थीबद्दल दूरध्वनीवरून दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. या युद्धात अनेक निष्पाप लोकांचा बळी जात असून हा संघर्ष थांबला पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कंबोडिया-थायलंड युद्ध मला भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाची आठवण करून देते, जो यशस्वीरित्या थांबवण्यात आला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी मी थायलंडसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी कंबोडियाच्या पंतप्रधानांशी नुकतेच बोललो आहे. योगायोगाने, आम्ही या दोन्ही देशांशी व्यापार करारावर वाटाघाटी करत आहोत, परंतु जर ते युद्धात असतील तर आम्हाला त्यांच्यापैकी कोणाशीही कोणताही करार करायचा नाही. कंबोडियासोबतची चर्चा संपलेली आहे. मी ही गुंतागुंतीची परिस्थिती सोपी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता मी कंबोडियाच्या पंतप्रधानांनाही तोच संदेश परत देणार आहे. दोन्ही बाजूंशी बोलल्यानंतर युद्धबंदी, शांतता आणि समृद्धी हा नैसर्गिक मार्ग अंगिकारला जाईल, असे ते पुढे म्हणाले.









