त्यांनीच व्यक्त केली चिंता, केले आंदोलनाचे आवाहन
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
येत्या मंगळवारी आपल्याला अटक केली जाईल, अशी चिंता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला अटक झाल्यास आपल्याला मानणाऱया लक्षावधी कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरुन निषेध आंदोलने करावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ट्रंप यांच्यावर एका महिलेचे शोषण केल्याचा आरोप असून त्याची चौकशी केली जात आहे.
या कथित प्रकरणाची चौकशी जे अधिकारी करीत आहेत, त्यांच्या कार्यालयामधून यासंबंधीचे व्हिडीओ बेकायदेशीरपणे बाहेर काढण्यात आले असून तो आता चर्चेचा विषय झाला आहे. सदर महिलेने आपल्या विरोधात तक्रार करु नये म्हणून ट्रंप यांनी दिला मोठी रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला होता, असाही आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
ट्रंप यांना या प्रकरणात गोवण्यात आलेच तर आवश्यक ती कायद्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करु असे प्रतिपादन ट्रंप यांच्या कायदेतज्ञाने केले. तथापि, या प्रकरणाची चौकशी ज्या मॅनहटन मध्ये सुरु आहे, तेथील सरकारी वकीलाने मात्र या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. हाच सरकारी वकील या प्रकरणाची चौकशी करत असल्याने त्याचे मौनही चर्चेचा विषय झाला आहे.
आरोपांचा इन्कार
या महिलेचे शोषण केल्याचा आरोप ट्रंप यांनी पूर्णतः फेटाळला आहे. या प्रकरणाशी आपला संबंध नाही. मात्र, अमेरिकेचे सध्याचे प्रशासन सूडभावनेने आपल्यावर कारवाई करत आहे. आपला न्यायव्यवस्था आणि जनता यांच्यावर विश्वास असून आपण कोणतेही कुकृत्त्य केलेले नाही हे सिद्ध होईल. आपल्याला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन त्यांनी पत्रकारांसमोर केले.









