वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
रशियाच्या इंधन तेलाची खरेदी केल्यामुळे भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लावणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आता चीनला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. चीनही रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात करीत आहे. त्यामुळे युरोपातील देशांनी रशियावर प्रतिबंध लागू करावेत आणि चीनकडून होणाऱ्या आयातीवर 50 ते 100 टक्के व्यापार शुल्क लागू करावे, असे वक्तव्य त्यांनी शुक्रवारी आपल्या ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाईटवर केले आहे. प्रथमच त्यांनी केवळ चीनचा उल्लेख केला असून भारताला त्यासोबत जोडलेले नसल्याचे दिसत आहे.
रशियावर कठोर निर्बंध घालण्यास अमेरिका सज्ज आहे. मात्र, त्यासाठी युरोपियन देशांनी रशियाकडून तेलाची खरेदी करणे थांबविले पाहिजे. तसेच रशियावर निर्बंध घातले पाहिजेत. त्यांनी तसे केल्याच अमेरिका रशियावर निर्बंध लागू करेल. अमेरिकेचा उद्देश रशिया आणि युकेन या दोन्ही देशांमधील हजारो निरपराध नागरीकांची, या युद्धामुळे होणारी हत्या थांबावी असा आहे. त्यामुळे, जोपर्यंत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबत नाही, तोपर्यंत युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध घालावेत आणि चीनवर 50 ते 100 टक्के कर लागू करावा, अशी मागणी मी करत आहे, असे ट्रंप यांनी संदेशात स्पष्ट केले आहे.
ट्रंप यांची कारणमीमांसा
डोनाल्ड ट्रंप यांनी चीन आणि भारत यांच्याकडून होत असलेल्या रशियाच्या तेलाच्या खरेदीला लक्ष्य केले आहे. या खरेदीमुळे रशियाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. या पैशाच्या जोरावर रशिया युक्रेनशी युद्ध करु शकतो. हा पैसा बंद झाला, तर रशियाला युव्रेनशी युद्ध करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही. परिणामी, हे युद्ध अपोआप थांबेल, असे ट्रंप यांचे प्रतिपादन आहे. त्यामुळे यांनी भारतालाही रशियाच्या तेलाची खरेदी करणे थांबविण्याचा आग्रह केला आहे. तथापि, आत्तापर्यंत तरी भारत किंवा चीन या दोन्ही देशांनी रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबविलेली नाही. कारण तेलाच्या आजच्या आंतरराष्ट्रीय दरापेक्षा रशियाचे तेल स्वस्त आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांची तेलाची आवश्यकता मोठी असल्याने त्यांना स्वस्त तेलाची आवश्यकता आहे. अमेरिकेने हे समजून घ्यावे, असे भारताचे प्रतिपादन आहे. सध्या याच मुद्द्यावर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अडकला आहे. मात्र, लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा मार्ग मोकळा होईल, असे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सूचित केले आहे. युरोपियन देशही रशियाकडून तेलाची आणि नैसर्गिक इंधन वायूची खरेदी करतात. त्यांनी ही खरेदी थांबवावी, असा जोरदार आग्रह ट्रंप यांचा आहे.









