युक्रेनसोबतचे युद्ध थांबविण्यासाठी वाटाघाटी : रशियाकडून अटींची शक्यता
वृत्तसंस्था/ मॉस्को
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज म्हणजेच मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी युक्रेन युद्ध संपविण्यासाठी चर्चा करतील. अमेरिकेने रशियाला 30 दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे. याचदरम्यान अमेरिकेला आम्हाला युद्ध संपविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बोलण्याची आपल्याला चांगली संधी आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी 30 दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली. रशियानेही तत्त्वत: सहमती दर्शवली असली तरी पुतीन यांनी कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काही अटी पूर्ण कराव्या लागतील, असे म्हटले आहे. नाटो देशांना युक्रेनला सदस्यत्व देणार नाही असे वचन द्यावे लागेल, असे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री अलेक्झांडर ग्रुश्को यांनी म्हटले आहे. युक्रेन तटस्थ राहील याची ठोस हमी आपल्याला मिळाली तरच युद्ध संपवण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ते पुढे म्हणाले.
युक्रेनसोबत तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपविण्यासाठी रशियाने शांतता कराराकडे वाटचाल करण्याबाबत भाष्य केले आहे. रशियाला या करारात काही कायमस्वरूपी हमी हव्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युक्रेनचे नाटो सदस्यत्त्व हाच असणार असल्याचे समजते. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा सुरू होण्यापूर्वी रशियाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी काही अटी लादण्याचे संकेत दिले आहेत.









