पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या धुमश्चक्रीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची समिकरणे बनत चालली आहेत. ‘भाजप म्हणजे मोदी व मोदी म्हणजे भाजप’ यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कारण भाजप विधानसभेच्या निवडणुका ही मोदी यांच्या नावावर लढत आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष काँग्रेसपासून सावध झाले आहेत. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने काँग्रेसवर उघड टीका करायला सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस हे तसेही काँग्रेस बरोबर अवघडलेल्या स्थितीत आहेत, नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यात काँग्रेसचा अडसर वाटतो. या परिस्थितीत भारतीय राजकारणात डोम कावळ्यांची संख्या वाढू लागली आहे. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस पार्टी, भारत राष्ट्र समिती, बहुजन समाज पार्टी हे पक्ष त्यांच्या सोईनुसार कोणाबरोबरही जाऊ शकतात. त्यांच्या लाईनमध्ये देवेगौडांचा जनता दल (एस),राष्ट्रीय लोक दल आणि असंख्य फुटकळ प्रादेशिक पक्ष आगामी काळात सामील झाले तर आश्चर्य वाटणार नाही.
एकदाची लोकसभा निवडणूक झाली की त्यांचे ‘मायग्रेटरी बर्डस’ (स्थलांतरित पक्षी) व्हायला वेळ लागणार नाही. ‘ज्याची सरशी तिकडे पारशी’ या उक्तीप्रमाणे हे डोमकावळे सरड्याप्रमाणे ताबडतोब रंग बदलतील. त्याला एखाद्या सुंदर तत्वज्ञानाचा मुलामा चढवून आपण खरे तर संन्यासी असेच दाखवतील आणि बगळ्याप्रमाणे सत्तारूपी मासा गिळंकृत करतील. रालोआत सध्या मोठ्या प्रादेशिक पक्षांची वानवा आहे कारण भाजपला लोकसभेत बहुमत असल्याने त्याला फारशी कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. पण जर निवडणुकात त्रिशंकू लोकसभा निर्माण झाली तर मात्र रातोरात स्थलान्तरित पक्षांचा बाजार भरेल आणि जो जास्त बोली लावेल त्याच्या हाती सत्ता येईल. पाच राज्यांच्या निवडणुकीत देखील डोमकावळ्यांची उपस्थिती आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसने निवडणूक समझोता न केल्याने समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव अतिशय संतापलेले आहेत. जर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही केंद्रात आहे तर ती राज्यातही आहे. आणि राज्यात ती नसेल तर केंद्रात ती असण्याला काय अर्थ आहे? असा रागारागाने युक्तिवाद ते करत आहेत. पण त्याचा अजिबात परिणाम काँग्रेस अथवा त्याच्या नेतृत्वावर झालेला दिसत नाही. त्यांची जणू गेंड्याची कातडी आहे. समाजवादी पक्षाची मध्यप्रदेशमध्ये फारशी ताकत नाही. उत्तरप्रदेशच्या सीमेलगतच्या काही मतदारसंघाशिवाय पक्षाला कोणी फारसे ओळखत नाही. पण काँग्रेसला अवलक्षण करण्यासाठी समाजवादी असो अथवा बहन मायावतींचा बसप असो नेहेमी पुढे असतात.
दोन महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या घोसीमधील पोटनिवडणुकीत काँग्रेससह साऱ्या इंडिया आघाडीने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिल्याने भाजपचा 50,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव करण्यात अखिलेश यादव यशस्वी झाले होते. पण त्याच वेळेला उत्तराखंडमधील बागेश्वर मतदारसंघात आपला उमेदवार उतरवून अखिलेश यांनी काँग्रेसला अपशकुन केला होता. त्याची भरपाई आता काँग्रेस मध्यप्रदेशात करत आहे. गमतीची गोष्ट अशी की नेहमी येनकेन प्रकारेन भाजपला मदत करणाऱ्या मायावतींनी या मतदारसंघात आपला उमेदवार न उतरवून अखिलेशची मदत केली आणि भाजपला धक्का दिला होता. कैलासवासी अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल हा पश्चिम उत्तरप्रदेशापूरता मर्यादित असला तरी कधी काँग्रेस तर कधी भाजपबरोबर जाण्याचे राजकारण करून तो एक थट्टेचा विषय बनला आणि त्याची शक्तीच क्षीण झाली.
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षदेखील आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी काहीही करू शकतो. तीच गोष्ट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी हे कोठल्याच आघाडीत नसले तरी पंतप्रधान जे सांगतील तसेच वागतात. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या बऱ्याच केसेस असल्याने ज्या दिवशी पंतप्रधान ठरवतील त्यादिवशी ते गजाआड जाऊ शकतात. उद्या जर पंतप्रधान बदलले तर रेड्डी यांचे धोरणदेखील बदलेल हे ओघानेच आले. रे•ाr यांचे आंध्रमधील विरोधक चंद्राबाबू नायडू यांना पुढील मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यात ज्या कोणाची त्यांना मदत होईल तिकडे ते जातील. केजरीवाल सध्या इंडिया आघाडीत असले तरी जिथेकोठे काँग्रेसला नडता येईल तिथे ते मागेपुढे बघत नाहीत. मोदींनी त्यांच्या तोंडाला फेस आणल्याने ते तात्पुरते विरोधी पक्षांबरोबर आहेत. त्यांची अतिमहत्वाकांक्षा काँग्रेसदेखील ओळखून आहे.
तेलंगणाच्या राजकीय धुमश्चक्रीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे पुरते ओढले गेलेले आहेत. साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच असा दावा केला की सत्ताधारी रालोआमध्ये येण्यासाठी रावसाहेबांनी इतक्यावेळा गयावया केल्या पण आम्ही त्यांना बाहेर ठेवले, मोदींच्या वक्तव्याचा आधार घेऊन राहुल गांधींनी ‘चंद्रशेखर राव हे भाजपचे बगलबचे’ आहेत हा आपला आरोप सिद्ध झाला आहे असे जणू ‘युरेका, युरेका’ म्हणून जाहीर केले. औरंगाबाद या मुस्लिम-बाहुल्य शहरातून गेल्या लोकसभा निवडणुकीत असाद्दुदिन ओवैसी यांचा पक्ष विजयी झाला होता. ते ओवैसी म्हणजे भाजपचे गुप्त मित्र आहेत हे उघड गुपित आहे. राजधानीच्या राजकीय वर्तुळात ओवैसी यांना भडकाऊ भाषण करायला लावून भाजप त्यातून आपली मतपेढी मजबूत बनवते अशी चर्चा फार पूर्वीपासून ऐकू येते. किती बरोबर अथवा चूक हे ज्याचे त्याने ठरवावे पण सरकारी तपास संस्था उठसुठ विरोधी पक्षांवर धाडी घालत बसतात पण ओवैसी याना संपूर्ण अभय देतात हे लोकांच्या नजरेपासून लपलेले नाही.
ओडिशाचे गेली जवळजवळ 25 वर्षे मुख्यमंत्री असलेले नवीन पटनाईक हे आता आजारी दिसत असले तरी त्यांची तेथील राजकारणावरील पकड गजबच आहे. नवीन यांची मानसिक स्थिती ठीक नाही असा दावा करणारा एक व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर झळकला. पण सत्ताधारी बिजू जनता दलाला त्याची फारशी फिकीर नाही. ओडिया बोलायला येत नसले तरी पटनाईक यांनी राज्यातील कारभारावर अशी पकड ठेवलेली आहे की ते जोपर्यंत हयात आहेत तोवर तेच मुख्यमंत्री राहतील असा दावा त्यांचे विरोधकदेखील करताना दिसतात. केंद्रात जो कोणी सत्तेत असेल त्यांच्याशी अजिबात पंगा न घेण्याचे पटनाईक यांचे धोरण आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर वादात आलेल्या द्रमुकबरोबर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 2004 मध्ये हातमिळवणी करून केंद्रात सरकार स्थापले होते हा ताजा इतिहास आहे. थोडक्यात काय तर ‘सत्तेसाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा’, असेच जणू ब्रीदवाक्य सर्व पक्षांचे आहे विशेषत: राजकारणातील डोमकावळ्यांचे आहे.
येती लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे याची चुणूक पाच राज्यांच्या निवडणुकातून दिसून येत आहे. काल परवापर्यंत अजेय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाला घाम फुटला आहे असे दिसत आहे. देशातील सर्वात जुना पक्ष दहा वर्षे विरोधी बाकावर बसून पस्तावला आहे. लोकसभेचा फड जर आता आपण मारला नाही तर सडून जाऊ अशी भीती त्याच्यात आहे तर सत्ताधारी मात्र ‘आपलेच नाणे खणखणीत’ असा दावा करत आहेत. अशा या महाभारतात कोण कौरव आणि कोण पांडव ते काळ ठरवेल पण डोमकावळे कोण राहणार हे साऱ्या जगाला ठाऊक झाले आहे.
सुनील गाताडे








