वृत्तसंस्था/ व्हिएन्ना
डॉमिनिक थिएमने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली असून त्याला शेवटच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. येथे सुरू असलेल्या अर्स्ट बँक ओपन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याला लुसियानो दर्देरीने हरविले.
ऑस्ट्रीयाच्या या 31 वर्षीय टेनिसपटूने निवृत्तीची घोषणा केली होती. मनगटाच्या दुखापतीनंतर तो पुनरागमन करण्यासाठी झगडत होता. येथील सामन्यात त्याने 4-2 अशी आघाडी घेतली होती. पण हा जोम त्याला पुढे टिकवता आला नाही. त्याला लुसियानोकडून 7-6 (8-6), 6-2 असा पराभव पत्करावा लागला. लुसियानोची पुढील लढत जॅक ड्रेपर किंवा केई निशिकोरी यापैकी एकाशी होईल. अन्य एका सामन्यात मार्कोस गिरॉनने अॅलेक्स मिचेल्सेनचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. अलेक्झांडर व्हेरेव्हशी त्याची पुढील लढत होईल.









