समिती आणि थोरात गटाचा 17 जागांवर दणदणीत विजय ; सभासद विकास पॅनेलला चार जागा
प्रतिनिधी/ सातारा
सगळय़ा जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिक्षक बँकेसाठी मतमोजणीला सकाळी 8 वाजता छत्रपती शाहु क्रीडा संकुलात सुरुवात झाली. पहिला निकाल परळी गटाचा हाती आला. तेव्हा समितीच्या तानाजी कुंभार यांनी विजयाने खाते खोलले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतमोजणी सुरु होती. शेवटचा निकाल महिला प्रवर्गाचा हाती आला त्यामध्येही समितीच्या महिलांनी बाजी मारली. बलवंत पाटील यांच्या सभासद परिवर्तन पॅनेलने 17 जागावर दणदणीत विजय मिळवून पुस्तके गटाच्या सभासद विकास पॅनेलला धुळ चारली. त्यांना केवळ चार जागावर विजय मिळवता आला. विजयी उमेवारांसह अख्या सभासद परिवर्तन पॅनेलने गुलालाची उधळण करत मतमोजणी केंद्रापासून ते पोवईनाका अशी पायी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ांस गुलालाच्या उधळण करतच अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक बँकेत विजयी सभा पार पडली. गुलालात चिंब न्हावून निघाले होते.
शिक्षक बँकेसाठी चुरशीने मतदान झाले होते. त्यामुळे निकालाकडे सगळय़ांच्या नजरा होत्या. सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी मतमोजणीला सुरुवात केली. 12 टेबलवर ही मतमोजणी सुरु झाली. सकाळी 8 वाजता सभासद परिवर्तन पॅनेल, सभासद विकास पॅनेल, स्वाभिमानी शेतकरी बँक परिवर्तन पॅनेलचे उमेदवार, कार्यकर्ते आतमध्ये होते. पहिला निकाल 10 वाजता हाती आला. त्यामध्ये परळी गटाचे समितीचे उमेदवार तानाजी कुंभार यांच्या विजयाची घोषणा होताच मतदान केंद्राबाहेर पहिला गुलाल समितीने उधळला. सुरुवातीपासून मतमोजणीमध्ये समिती पुढे होती. त्यामुळे बहुतांशी सर्वच सर्वसाधारण गटामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसत होते. परंतु पुस्तके गटाचे कराड-पाटणचे उमेदवार महेंद्र जानगुडे यांनी विजयी खाते खोलले. तेव्हा पुस्तके गटाला आशा वाटू लागली. पंरतु पुन्हा सभासद परिवर्तनने विजयी घौडदौड सुरुच ठेवली. त्यात नागठाणे, परळी, महाबळेश्वर असे निकाल हाती आले. संघाला केवळ आरळे, जावली, मायणी आणि कराड या जागांवर विजय मिळवता आला. 17 जागा विजयी झाल्याचे जाहीर होताच सभासद परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर कोण आली रे कोण आली, कपबशी आली, बलवंत पाटील यांचा विजय असो, उदय शिंदे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गुलालाच्या उधळणीत मतदान केंद्रापासून भव्य अशी पायीच मिरवणूक पोवई नाका ते शिक्षक बँक अशी काढण्यात आली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजाच्ंया पुतळय़ास गुलालामध्ये उमेदवारांसह पॅनेलचे समन्वयक किंगमेकर बलवंत पाटील यांनी अभिवादन केले. तेथून बँकेत विजयी सभा पार पडली.
गिरवी-तरडगाव मतमोजणीवेळी आक्षेप
गिरवी तरडगाव मतदार संघात सभासद विकास पॅनेलच्या उमेदवारास निवडणूक येण्याची 200 टक्के खात्री असल्याने त्यांचे कार्यकर्ते मतमोजणीच्या टेबलकडेलाच होते. सभासद परिवर्तन पॅनेलच्या राजेंद्र बोराटे यांनी केवळ 5 मतांनी पराभव झाल्याचे समजताच त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची विनंती केली. तेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी पुन्हा मतमोजणी करता येणार नाही. आकडेवारी तपासा अशी सुचना दिली. परंतु पुन्हा विनंती करताच मतमोजणी केली. त्यावेळी शिक्यावरुन दोन मतांवर आक्षेप घेतला. ती मते बाद ठरवा अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जावू असे विचारातच ती दोन मते बाद न ठरवता बेजरेत पकडली आणि बोराटे यांना विजयी घोषीत करण्यात आले.
दोघे जिवलग मित्र परंतु एकमेकांच्या विरोधात
रहिमतपूर मतदार संघातून दोन्ही पॅनेलेचे उमेदवार पृथ्वीराज गायकवाड आणि सुरेश पवार हे दोघे एकमेकांचे जीवलग मित्र, दोघेही एकाच गाडीवरुन दररोज फिरणे, उठणे, बसणे असते. परंतु एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. दोघांच्या नजरा कोण विजयी होते याकडे होते. शेवटी 254 मते पवार यांना तर 250 गायकवाड यांना पडली. केवळ चार मतांनी विजयी ठरले.
सर्वात जास्त मतांचा किरण यादव यांचा विक्रम
विद्यमान संचालक किरण यादव हे निवडणूकीत सहकार परिवर्तन पॅनेलमधून इतर मागास प्रवर्गातून निवडणूक लढवत होते. त्यांनी निवडणूकीतील रेकॉर्ड मोडत तब्बल 5 हजार 145 मते पडली तर सहकार विकास पॅनेलचे उमेदवार संतोष शिंदे यांना 3 हजार 513 मते पडली. रेकॉर्ड ब्रेक 1632 मतांनी विजयी ठरले.
सर्वात कमी मतांनी तीन जण विजयी
जावली मतदार संघातून श्यामराव जनुघरे यांना केवळ 4 मतांनी विजय शिर्के यांनी हरवले. तसेच रहिमतपूर मतदार संघातून गायकवाड यांना पवारांनी 4 मतांनी हरवले. गिरवी मतादार संघातही राजेंद्र बोराटे हे 5 मतांनी विजयी झाले.
पोलीस आणि पत्रकार उपाशी
बंदोबस्तावर असलेले पोलीस आणि वार्ताकंन करण्यासाठी असलेले पत्रकार हेही सकाळपासून मतमोजणीच्या ठिकाणी होते. मतमोजणी करणाऱया कर्मचाऱयांनाही पाणी सुद्धा उशीरा 12 वाजता मिळाले. जेवण तर अडीच वाजता पोहचले. दस्तुरखुद्द निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनीही सगळय़ात शेवटी जेवण टेबलवरच केले. परंतु बंदोबस्तावर असलेले पोलीस आणि पत्रकार यांना पाणी नाही, जेवणही नाही असा प्रकार नियोजनकर्त्यांकडून झाला.