14.2 किलोच्या सिलिंडर दरात 50 रुपयांनी वाढ ः गृहिणींचे बजेट कोलमडणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शनिवारी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्ली आणि मुंबईत नवीन किंमत 999.50 रुपये म्हणजेच जवळपास ‘हजार’ पार पोहोचली आहे. एलपीजी सिलिंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
नव्या दरवाढीनंतर बिहारमध्ये गॅस सिलिंडरची किंमत सर्वाधिक 1,100 रुपयांच्या पुढे गेली आहे. बिहारमधील सुपौल येथे घरगुती गॅस सिलिंडर 1,104.50 रुपये मिळत आहे. यापूर्वी मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. बिहारप्रमाणेच मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 14.2 किलोचा सिलिंडर 1,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीत गेला आहे. तसेच अलीकडेच 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 102 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर कमर्शियल सिलिंडरची किंमत 2,355 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी कमर्शियल सिलिंडरची किंमत 1 एप्रिल रोजी 250 रुपयांनी वाढविण्यात आली होती. तसेच पाच किलो एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावण्यास सुरुवात केली आहे. देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यांपासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे.
वर्षभरात गॅस सिलिंडर 190.50 रुपयांनी महाग
1 मे 2021 रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपये होती. आता मे 2022 मध्ये ही किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 190.50 ने वाढ झाली आहे. त्याचबरोबर यावरील अनुदानही रद्द करण्यात आले आहे. तसेच गेल्या आठ वर्षात किंमत अडीच पटीने वाढली आहे. 1 मार्च 2014 रोजी घरगुती सिलिंडर 410 रुपयांना मिळत होता.









