कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
डॉलरचा दर वधारल्याने, कोल्हापूरातून परदेशी जाणाऱ्या पर्यटकांना व परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांना व पालकांना याचा आर्थिक फटका बसू लागला आहे. कोल्हापूरात दर महीना पर्यटकाकडून चार लाख डॉलरची उलाढाल होत असते.. स्थानिक पर्यटकानां अवघ्या एका महीन्यात डॉलरसाठी रूपये चलनासाठी जादा सुमारे नऊ लाख रूपये मोजावे लागत आहे.
गेल्या कांही दिवसापासून डॉलरचा दर वाढत असून, भारतीय रूपये चलन कमकुवत होत चालला आहे. गेल्या महीन्यात रिझर्व्ह बँकेच्या दरानुसार डॉलरचा दर 84.60 पैसे इतका होता. हाच दर 14 जानेवारी 2025 रोजी डॉलरचा दर 86.90 पैसे इतका झाला आहे. जगात आर्थिक व्यवहारासाठी अमेरिकन डॉलरला प्राधान्य दिले जाते. या दरवाढीमुळे पौंड व्यतिरिक्त जगातील इतर चलनाच्या दरात ही वाढ झाली आहे. जगात अमेरिकन डॉलरशिवाय व्यवहार होत नाही. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प याच्या विजयानंतर डॉलर निर्देशांक सातत्याने वाढत चालला आहे. 2008 पासून डॉलरच्या तुलनेत रूपया घसरत चालला आहे.
डॉलर दरवाढीमुळे स्थानिक पर्यटकांना याचा फटका बसत आहे. कोल्हापूरात पाच खाजगी परदेशी चलन विनिमय टूरिझम कंपन्या तर 4 ते 5 बँका परदेशी चलनाचे व्यवहार करत आहेत. एप्रिल ते जून हा कोल्हापुरचा परदेशी पर्यटनाचा सिझन आहे. युरोपियन देश, दुबई,श्रीलंका,हाँगकाँग,थायलंडसह इतर देशासाठी बुकींग सुरू झाले आहे. यापूवीं झालेले परदेशी बुकींग व आता होणारे बुकींग या दरामध्ये आता वाढ झाली आहे. नेहमीपेक्षा आता 10 ते 20 हजार रूपये जादा मोजावे लागणार आहे.
कोल्हापूरातून दरवर्षी दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी युरोपियन व मिडल इस्टमध्ये परदेशामध्ये शिकण्यासाठी जात आहेत. नुकतेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता परदेशी फीचा दुसरा हप्ता जादा पैशाने भरावा लागणार आहे. ही फी लाखामध्ये असल्याने, डॉलर दरवाढीमुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
डॉलर दरवाढीमुळे परदेशातील शिक्षण महागणार आहे. तसेच आयात खाद्यतेल, पेट्रोलियम इंधन, सोने याच्या दरात वाढ होणार आहे. तर परदेशातून भारतात येणाऱ्या वैद्यकीय पर्यंटन (मेडिकल टुरिझम) उद्योगाला भारताला आर्थिंक फायदा मिळणार आहे. सद्या डॉलर दरवाढीमुळे पर्यटनामध्ये विमान सेवा,हॉटेल आदीचेदर वाढणार आहे.
- डॉलर दरवाढीबाबत पर्यटक समजून घेतात
परदेशी पर्यटनाचा सिझन सुरू झाला आहे. डॉलरचा दर वाढत असल्याने,पर्यटनाला ही फटका बसत आहे. सद्या परदेशी जाणारे स्थानिक पर्यटक डॉलर दरवाढीबाबत समजून घेत आहेत. वाढलेल्या डॉलरमुळे जादा रक्कम देण्यासाठी तयारी दाखवली जात आहे.
–बी. व्ही. वराडे, ट्रेडविंग्ज,फॉरेक्स कोल्हापूर








