खासदार उदयनराजे भोसले आक्रमक, शासनाने डॉल्बी का नको हे पत्रक काढून जाहीर करावे
प्रतिनिधी/ सातारा
डॉल्बी हा एक व्यवसाय असून ज्यांना नोकऱया नाहीत, त्यांनी बँकांची कर्जे घेवून हा व्यवसाय सुरु केला आहे. दोन तास डॉल्बी वाजल्याने आभाळ कोसळणार नाही. मात्र डॉल्बी वाजली नाही तर त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीचे आभाळ कोसळेल. त्यामुळे उत्सवाच्या कालवाधीत डॉल्बीला परवानगी मिळालीच पाहिजे, या मताचा केवळ मी नाही तर हे सगळे आहेत, अशी भूमिका खासदार उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये बोलून दाखवली. दरम्यान, शासनाने डॉल्बी का नको हे याचे पत्रक काढावे, असेही आवाहन केले.
साताऱयात काही पत्रकारांनी खासदार उदयनराजेंची डॉल्बीवर प्रतिक्रिया घेतली. त्यावर ते म्हणाले, अनेक युवकांचे शिक्षण झाले आहे. शिक्षण प्राप्त होवून देखील सगळयांनाच नोकऱया मिळत नाहीत. त्यातही शासकीय नोकरी मिळणे दुर्मिळ झाले आहे. खासगी कारखान्यामध्ये सुद्धा कामगार भरले जात नाहीत. अशा वेळेस जे सुशिक्षित तरुण आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी व्यवसाय उभा करतात. कोण कंपनी टाकते, कोण हॉस्पिटल करते तर कोण करमणूक विभागात गुंतवणूक करते. आपल्याकडे वेगवेगळे सण उत्सव असतात, यासाठी लागणारे वाजंत्री ढोल, तबला किंवा सनई हे वाजवले जात होते. जगात प्रगती झाली तरी मात्र जुनी वाद्ये कालबाह्य होणार नाहीत. परंतु नवीन तंत्रज्ञानाची गरज असून मोठा कार्यक्रम असेल तर त्याचा आवाज लांबपर्यंत पोहचू शकत नाही. ज्या लोकांनी यामध्येही गुंतवणूक केली, त्यांनी कर्ज काढून व्यावसाय उभा केला आहे.
डॉल्बीवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबांचा उदयनिर्वाह चालतो. प्रशासनाने डॉल्बीला परमिशन द्यावे अगर देवू नये हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली तर त्यांनी जी गुंतवणूक केली ती तशीच शिल्लक राहणार आहे. मग त्या डॉल्बीवाल्यांनी काय भीक मागायची का?, वाडग घेवून बसायचे काय?, शासनाने त्यांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. शासन तरी किती लोकांची व्यवस्था करणार आहे. निदान त्याला आडवे काम लावण्याचे कोणी करु नये.
कुठलातरी एक लोकप्रतिनिधी सांगतो म्हणून तुम्ही मनाई करता. ते लोकप्रतिनिधी कोण या लोकांचे बघणार कोण?, जेवढे अधिकारी वर्ग आहेत. त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती असते. म्हणून त्या पदावर पोहचू शकले नाहीतर त्यांनाही डॉल्बीवाल्यासारखा व्यवसाय करावा लागला असता. डॉल्बीला परमिशन दिली पाहिजे. कॅन्सर होतो ते पहिले बंद केले पाहिजे, डॉल्बी का नको याचे शासनाने उत्तर दिले पाहिजे.
सगळे कारखाने सील करुन टाका
कोणीतरी अर्ज देतो डॉल्बीमुळे अमुक अमूक त्रास होतो. स्वतःचा घरगुती कार्यक्रम असतो त्यावेळी त्याना डॉल्बी चालतो. जेवढे मोठे कारखाने पाण्याचे पोल्युशन करतात, त्यामुळे रोगराई पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावर शासन काहीच करत नाही. परवाच पोलुशन कंट्रोल बोर्डच्या लोकांना बोलवून घेतले आणि त्यांना सांगितले की जेवढे साखर कारखाने आहेत त्यांनी ट्रीटमेंट प्लंट बसवले नाहीत. ते सगळे कारखाने सील करुन टाका. जे कारखाने कागदावर प्लॅन्ट करतात. शिरवळमध्ये केमीकलच्या इंस्ट्रीज असून पर्यावरणाचा धोका आहे अशा इंडस्ट्रीज आहेत. तेथे ट्रीटमेंट प्लॅट नाही, तिथे तुम्ही काय कारवाई करणार हे सांगा.








