सातारा :
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आर्वजून तीन वेळा डीजेला परवानगी आहे पण नियम मोडू नका असे बजावून सांगितले होते. तरीही रजनी डीजेवाल्याने साताऱ्यात आमचं कोणीच काही करु शकत नाही. या तोऱ्यात रात्री 8.30 वाजताच देवी चौकाजवळ आवाज वाढवल्याने मिरवणुकीच्या बंदोबस्तात असलेल्या साध्या वेशातल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांने डीजेवाल्या नागेला आवाज कमी कर अशी विनंती केली होती. परंतु रजनीकांत नागे याने त्याच्या डीजे ऑपरेटरला आवाज कमी कर असे सांगण्याऐवजी वाढवायला लावला. मग कारवाईची सुत्रे फिरली अन् मोठ्या थाटामाटात सुरु केलेल्या डीजेची वरात थेट शाहुपूरी पोलिसांच्या दारात न्यावी लागली. डॉल्बीसह ट्रॅक्टरही पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी डीजे मालक रजनीकांत नागे याच्यासह चार जणांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिरवणुकीची ऑर्डर मिळाल्यानंतर डीजेवाला रजनी नागे याने तयारी केली होती. राजवाडा स्टॅण्डवरच रविवारी सकाळपासून ट्रॅक्टर लावून त्यावर डीजेची रुम तयार केली होती. त्या रुमची सजावट आणि लाईटींगच पाहण्यासाठी दिवसभर बघ्यांची गर्दी सुरु होती. या डीजेच्या सिस्टिममुळे दिवसभर राजवाडा बसस्थानकात कोंडी होत होती. मिरवणूक सायंकाळी 6 वाजता सुरु झाली. मिरवणुकीला रंग भरु लागल्यावर अगोदरच शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे हे अतिशय अॅक्टीव्ह, नागे कसा जाळ्यात सापडतोय यावरच ते सावज लावून थांबले होते. त्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्या बंदोबस्तामध्येच एक कर्मचारी साध्या वेशात होता. त्यांनी नागेला देवी चौकात मिरवणूक असताना रात्री 8.20 वाजता आवाज कमी कर अशी विनंती केली.
मात्र, सळसळत्या रक्ताचा रजनीकांत नागे याने उलटेच त्याच्या डीजे ऑपरेटरला सांगितले. डीजेचा आवाज वाढला. अगोदरच डीजेचा आवाज स्वॉफ्ट येत होता असे तेथे बघणारे सांगतात. परंतु डेसीबलवर आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे मशिनने दर्शवताच लगेच कारवाईची सुत्रे हलली. तेथेच ड्युटीला असलेले पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी काहीही न एकता डीजेवाल्याला पहिला डीजे बंद कर, अशा सूचना करत त्यांनी आरटीओ ऑफिसला कळवून बोलवून घेतले. कारवाईला सुरुवात केली. डीजेच्या भिंती उभ्या केलेला ट्रॅक्टरही बाजूला काढायला सांगून सर्व त्यावरची मशिनरी उतरवून ती जप्त केली. रात्री गुन्हा दाखल करण्यासाठी पावणे चार वाजले.
या प्रकरणी रजनीकांत चंद्रकांत नागे (वय 41 रा. मल्हारपेठ सातारा), धीरज रमेश महाडिक (रा. कलावाणिज्य कॉलेजजवळ), दीपक रामचंद्र जगताप (रा. इंद्रायणीनगर भोसरी), हर्षल राजाराम शिंदे (रा. पाटखळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईची चर्चा सातारा शहरात सुरु होती.








