सातारा / दीपक प्रभावळकर :
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याने अनेक क्रांती घडवल्यात. आता ‘डॉल्बीमुक्त सातारा ‘साठी साताऱ्याचे तरुण नव्हेतर वयस्कर उभे राहिले आहेत. याबाबत उदयनराजे, शिवेंद्रराजे, शंभूराज, मकरंद यांनी कणखर भूमिका घ्यावी, यासाठी ‘तरुण भारत’ने डॉल्बीमुक्त साताऱ्याचा नारा अंगिकारला आहे. ‘तरुण भारत’च्या सडेतोड आणि कणखर भूमिकेचे केवळ साताऱ्यातच नव्हेतर महाराष्ट्रभर जोरदार कौतुक झाले. याच दरम्यान साताऱ्याचे रहिवासी-नागरिक शंभूराज, शिवेंद्रराजे, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कणखर भूमिका घेतल्यामुळे आता डॉल्बीवाल्यांच्याच कानठाळ्या बसल्या आहेत.
डॉल्बी किंवा आवाजाच्या क्षमता तोडणाऱ्या स्पीकरच्या किमती यांनी साताऱ्यात कहर माजवला होता. अबालवृद्धांना अपंग करणारा हा डॉल्बीचा प्रकार राजधानी साताऱ्याच्या बाहेर फेकला जावा म्हणून काहींनी आवाज उठवला होता. मात्र यंदा ‘पेन्शनर सिटी’ असलेल्या साताऱ्यातल्या वृद्धांनी यल्गार पुकारला. भरपावसात या म्हाताऱ्यांचा आक्रोश थांबला नाही.
‘तरुण भारत’ ने वडापाववाले बहुलेकाका यांच्या मृत्यूपासूनच डॉल्बीविरोधात आपली भूमिका मांडली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या मोर्चामुळे त्याला चालना मिळाली. ‘तरुण भारत’ने ‘महाराज, नेत्यांना तुम्ही नागरिक केव्हा होणार’ याचबरोबर डॉल्बीवाल्यांचे नेते नको, राजधानीचे नागरिक व्हा, असे सडेतोड वार्तांकन केल्यानंतर डॉ ल्बीविरोधातील ही चळवळ आगीसारखी सगळ्या साताऱ्यात पसरली. नेत्यांच्या विरोधात दबलेला आवाज ‘तरुण भारत’मुळे उजागर झाला.
- डॉल्बीमुळे फिट येणाऱ्या मुलाला सातारा बंदी
माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्या वॉ र्डातील एका बारा वर्षाच्या मुलाला डॉल्बीचा इतका फटका बसला आहे की, कर्णकर्कश आवाज येताच फिट येऊन तो बेशुद्ध पडतो. डॉक्टरांनी त्याला गणेशोत्सवाच्या काळात साताऱ्याबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. स्वतः अविनाश कदम हेच पुण्याच्या दवाखान्यात चेकींगला गेल्यामुळे संबंधित युवकाची अधिक माहिती देऊ शकतील.
- बाप गाडीत मुतताना मुलगा रडला
शाहूनगरमधील एक युवक आईवडिलांना घरी घेऊन जात होता. वाटेतच डॉल्बी लागली. गाडी मागे पण घेता येत नव्हती. डॉल्बीचा थरकाप इतका होता की वडील अस्वस्थ झाले. आणि या अवस्थेततच वडिलांना गाडीत लघवी झाली. दोन्हीकडून बांधलेल्या (सुहास भोसले – नाव बदलले आहे) या युवकाला आपले अरूण्यरूदन सांगताना रडू थांबत नव्हते.
- माणसेच काय कुत्रीही हैराण
साताऱ्यात डॉल्बीचा कहर राजवाडा ते नगरपालिका आणि शेटे चौक ते मोती चौक इतक्यातच चालतो. याचा कहर वयोवृद्ध लोक, लहान बाळ, गर्भवती महिला यांच्यावर झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. मात्र शाही मशिदीच्या समोरील भोसले कुटुंबातील एका कुत्रीवर डॉल्बीचा प्रचंड प्रभाव झाल्याने गेल्या एक वर्षापासून तिच्यावर शिरवळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सुमारे ३० हजार रूपये खर्च झाले आहेत. आता डॉक्टरांनी गणेशोत्सव काळात संबंधित कुत्रीला साताऱ्यापासून लांब ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सातारा शहरातील डॉल्बीचा अतिरिक्त वापर हा राजधानी साताऱ्यातील नागरिकांवरच नाहीतर प्राणीमात्रांवरही सुरू आहे.
- हिंमत असेल तर फोटो आणि शुटींग करा
सातारच्या राजपथावरील सेंटर असलेल्या शाही मशिदीशेजारीच जुना दवाखाना आहे. या पाठीमागे वडाची आणि पिंपळाची मोठी झाडे आहेत. अनंत चतुर्थी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी या झाडांच्या पायथ्याला चिमण्या, पारवं, कावळे, घारी मरून पडल्याचं चित्र असतं. हिम्मत असेल तर माध्यमांनी त्याचेही शुटींग करावं, असं आवाहन निसर्गप्रेमी नितीन भोसले यांनी केले आहे. एकूणच ‘तरुण भारत’ने घेतलेल्या उघड भूमिकेमुळे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, पालकमंत्री, आमदार तथा बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले या सगळ्यांनीच कठोर भूमिका घेतल्यामुळे लोकांना कर्णबधीर करणाऱ्या डॉल्बीवाल्यांच्याच कानठाळ्या बसल्या आहेत.
- बेकायदेशीर वागणाऱ्या मंडळास सहकार्य करणार नाही
सुप्रीम कोर्टाने दिलेला न्याय कोणीच पायदळी तुडवू शकत नाही. कायद्याचे उल्लंघन करणारे कोणतेही मंडळ असो, किंवा डॉल्बीचालक असो, संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणारच. बेकायदेशीरपणे वागणाऱ्या कोणत्याही मंडळाला किंवा डॉल्बीचालकाला आम्ही सहकार्य करणार नाही.
– शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
- ‘तरुण भारत’ च्या भूमिकेचे स्वागत
‘तरुण भारत’च्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. यापूर्वी दोनवेळा सूचना जारी केल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वीच दोन ठिकाणी कारवाई झाली आहे. कायद्याविरूद्ध कोणा मंडळाकडून कृती झाली तर त्याचठिकाणी त्याच वेळेला कारवाई करण्यासाठी सातारा पोलीस दलातील जवान सज्ज आहेत. पोलिसांच्या सूचनेचा गणेशोत्सव मंडळांनी समज घ्यावा.
– तुषार दोशी, पोलीस अधीक्षक
- आवाज वाढला तर कारवाईचे आदेश
‘तरुण भारत’ने केलेल्या लोकभावनेचा आम्ही आदरच करतो. बेकायदेशीर वर्तणुकीवर चाप बसवण्याचा अधिकार पोलीस दलाला असून आम्ही पूर्ण मुभा दिलेली आहे. नियंत्रणाबाहेर आवाज वाढला तर संबंधितांना कठोर शिक्षा करण्याचे आदेश यापूर्वीही दिले आहेत व आज ‘तरुण भारत’च्या माध्यमातून देत आहोत.
– संतोष पाटील, जिल्हाधिकारी
- कोणालाच सुट्टी मिळणार नाही
इथं कायद्याचे राज्य आहे. कायद्याने दिवसा ५५ डेसीबल आणि रात्री ४५ डेसीबलचे नियंत्रण घातले आहे. गणेशोत्सव हा राज्य उत्सव आहे. तो मोठ्या थाटात साजरा व्हावा, पण नियमांचं उल्लंघन केलं तर कोण्या मंडळ किंवा डॉल्बीवाल्याला सुट्टी देणार नाही.
– शंभूराज देसाई, पालकमंत्री








