वाई :
सध्या वाई शहरात डॉल्बी असावी का नसावी, या बाबतीत रणकंदन – सुरू असून डॉल्बीमुक्त समितीच्या माध्यमातून सर्व सण आणि समारंभात डॉल्बीचा वापर होऊ नये. त्याऐवजी पारंपरिक वाद्ये लावून सण, समारंभ साजरे व्हावेत, असा आग्रह केला जात आहे. याला वाई शहरच नव्हे तर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरीसुद्धा युवा मंडळींचा आग्रह डॉल्बी असावी, असाही दिसून येतो. त्यादृष्टीने त्यांनी येथील विश्रामगृहावर थांबलेल्या मंत्री महोदयांना विनंती केली. परंतु या बाबीला संपूर्ण तालुक्यातील विरोध असल्याची कल्पना त्यांना असल्याने त्यांनी याबाबतीत कोणताही ठोस निर्णय युवा मंडळींना दिला नाही.
डॉल्बीचे दुष्परिणाम प्रचंड प्रमाणात आहेत, याची कल्पना शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींना आहे. परंतु युवकांच्या आग्रहास्तव व डॉल्बी लावली जाते आणि त्याचे दुष्परिणाम ज्येष्ठ नागरिक, हृदयरोग रुग्ण, विद्यार्थी, गृहिणी यांना घ्यावे लागतात. शिवाय काचेची तावदाने, भांडी यांनाही ते सोसावे लागतात. डॉल्बी लावून काय मिळते, याची कल्पना कोणीच करत नाही.
‘तरुण भारत’ने डॉल्बीविरोधात भूमिका घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात डॉल्बीबंदीचे वातावरण तयार झाले आहे. साताराच नव्हे तर कोल्हापूर सांगली, सोलापूर, अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यातही तीव्र विरोध होत आहे. अनेक वाचकांनीही यास पाठिंबा व्यक्त केला आहे. असंख्य ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी फोनद्वारे या मोहिमेस पाठिंबा व्यक्त केला आहे. काही वयरकर विचारवंतांनी एक सूचना मांडली असून वाईत डॉल्बीसाठी सर्व सोयींनीयुक्त असा मोठा हॉल बांधावा. त्यात डॉल्बी लावावे आणि युवकांना तिथे नाचण्याकरता सोडावे. युवामंडळी खुश होतील कारण विविध गाण्यावर त्यांना नाचता येईल आणि ज्यांचा डॉल्बीला विरोध आहे, तेही खुश कारण तो गोंगाट हॉलमध्येच बंदिस्त राहील, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला आहे. एकंदरीत सर्वत्र कानोसा घेता वाई शहरात डॉल्बीबाबत तीव्र तिरस्कार असून पारंपारिक वाद्यांनी पूर्वीप्रमाणे सण समारंभ साजरे व्हावेत, अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करीत आहेत.
- डॉल्बी… मागे वळून पाहताना
मला आठवते आहे.. म्हणजे लहान वयात… कळतं होतं… दातार दवाखान्याजवळ मी रहातो. रानडे वाडा (सध्या धनंजय मेडिकल) येथे खांबावर बोर्ड होता… आवाज बंद… कोणतीही मिरवणूक आली की बँड वाजवणे, लाऊड स्पीकर असेल तर बंद होतं असे. कारण दवाखाना पुढे आहे… पण आता तो बोर्ड काळाच्या पडद्याआड गेला… आम्ही पण शिकलो. आता कोणी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही.. दवाखाना असो, शाळा असो… डॉल्बीचा आवाज काही कमी होतं नाही…
- हे लिहीत आहे त्याचं कारण…
एक वर्षापूर्वी माझी धाकटी मुलगी बाळंत झाली दातार दवाखान्यात. दिवस होता गणेश चतुर्दशीच्या आधीचा दिवस. काही मिरवणुका आदल्या दिवशी असतात.. डॉल्बीचा प्रचंड आवाज.. आपल्या छातीत पण धडका बसत असतात. सकाळीच लहान बाळ जन्माला आले होते. हा त्रास बाळाला सहन होईल का ही शंका… त्या दिवशी ४ मुली बाळंत झाल्या होत्या. माझ्या मुलीची सासू पण डॉक्टर आहे. आम्ही निर्णय घेतला व डॉ. मनोहर दातर यांना विनंती केली की संध्याकाळी एक दिवसही पूर्ण झालेले नाही, अशा लहान बाळाला आम्ही घरी घेऊन जातो व मिरवणूक संपली की परत बाळाला दवाखान्यात घेऊन येऊ. डॉक्टरांनी पण परवानगी दिली व बाळाला घरी घेऊन आलो. बेडरूमची सर्व दारे व खिडक्या बंद करून बाळाला ठेवले व रात्री परत दवाखान्यात पोहोच केले.. कधी कार्यकर्त्यांना समज येणार आहे की डॉल्बी चा आवाज कमी ठेवावा… दवाखान्याजवळ डॉल्बी बंद ठेवावा…








