वार्ताहर /उचगाव
उचगाव ग्रामपंचायतने गणेशोत्सवातील आगमन सोहळा व विसर्जन सोहळ्याला डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्यांच्या साह्याने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून गावातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केल्याने ग्रामपंचायतच्यावतीने या सर्व गणेशोत्सव मंडळांचे अभिनंदन करण्यात येत आहे. व हीच परंपरा पुढेही अशीच चालू ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळपासून उचगावमधील घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्याचा कार्यक्रम सर्वत्र दिसून येत होता. उचगावमध्ये गावाच्या पूर्व दिशेला मोठा तलाव असून या तलावामध्येही गणेश विसर्जनासाठी खास व्यवस्था ग्रामपंचायतीने केली होती. तसेच बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावरही गणेश विसर्जनासाठी खास सोय करण्यात आली होती. त्यानुसार उचगाव आणि या भागातील गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. सायंकाळी सहानंतर उचगावमधील जवळपास आठ गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी शुभारंभ केला. यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोलताशा, सनई यांचा उपयोग करून युवक मंडळे, गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊन विसर्जन मिरवणुका गावातून काढण्यात आल्या.









