महिला विश्वकरंडक फुटबॉल : अर्जेंटिना-द. आफ्रिका सामना बरोबरीत
वृत्तसंस्था/ .वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त यजमान पदाने सुरू असलेल्या 2023 च्या फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्वीडनने इटलीचा 5-0 असा दणदणीत पराभव करत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत झालेल्या अन्य एका सामन्यात अर्जेंटिनाने दक्षिण आफ्रिकेला 2-2 असे बरोबरीत रोखले.
शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्या 39 मिनिटांच्या कालावधीत स्वीडनच्या अमंदा इलस्टेडने दोन गोल नोंदवले. वेगवान आणि आक्रमक खेळावर अधिक भर देत स्वीडनने मध्यंतरापर्यंत इटलीवर 3-0 असी एकतर्फी आघाडी मिळवली होती. स्वीडन संघातील जोना अँडरसन आणि फ्रिडोलिना रोल्फो व स्टिना ब्लॅकस्टेनीस यांच्याकडून अमंदाला चांगली साथ मिळाली. मध्यफळीत खेळणाऱ्या इटलीच्या इलस्टेडने मध्यंतरानंतर काही मिनिटातच संघाचा व वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून हॅट्ट्रीक नोंदवली. महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इटलीचा हा सर्वात दारुण पराभव म्हणून नोंद झाली आहे. 2003 साली इटलीने या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. इटलीतर्फे आघाडी फळीतील सोफिया कँटोरने पहिल्या आणि 17 व्या मिनिटाला स्वीडनच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण स्वीडनची गोलरक्षक मुसोव्हिक हिचे गोलरक्षण भक्कम झाल्याने इटलीला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. स्वीडनचा तिसरा गोल सामन्यातील पूर्वार्धात पहिल्या स्टॉपेज कालावधीत नोंदवला गेला. रॉल्फोने हा गोल केला. इलस्टेडने आपला दुसरा गोल खेळाच्या 50 व्या मिनिटाला केला तर स्वीडनच्या कँटोरने गोल करण्याच्या दोन संधी वाया घालवल्या. या विजयामुळे स्वीडनने शेवटच्या 16 संघात स्थान मिळवले आहे. त्यांचा प्राथमिक फेरीतील अद्याप एक सामना बाकी आहे. ग गटातून इटलीचा शेवटचा सामना द. आफ्रिकाबरोबर येत्या बुधवारी होणार आहे.
अर्जेंटिना आणि द. आफ्रिका यांच्यातील ग गटातील सामना 2-2 असा गोल बरोबरीत राहिला. या सामन्यात अर्जेंटिनातर्फे सोफिया ब्रॉन आणि रोमिना नुनेज यांनी प्रत्येकी एक गोल केला तर द. आफ्रिकातर्फे लिंडा मोथेलो आणि टी कॅगेटलिना यांनी प्रत्येकी एक गोल केला. ग गटामध्ये स्वीडन आणि इटली यांचाही समावेश आहे. या सामन्यात तिसाव्या मिनिटाला द. आफ्रिकेचे खाते लिंडा मोथेलोने उघडले. मध्यंतरापर्यंत द. आफ्रिकेने अर्जेंटिनावर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. 66 व्या मिनिटाला द. आफ्रिकेचा दुसरा गोल टी कॅगेटलिनाने नोंदवल्याने हा सामना द. आफ्रिका जिंकेल असे वाटत होते पण शेवटच्या 20 मिनिटांच्या कालावधीत अर्जेंटिनाने वेगवान खेळ करत सामन्याचे चित्र पालटले. 74 व्या मिनिटाला सोफिया ब्रॉनने अर्जेंटिनाचा पहिला गोल केला तर 79 व्या मिनिटाला रोमिना नुनेजने दुसरा गोल करून हा सामना बरोबरीत राखला.
केर शेवटच्या सामन्यात खेळणार
महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना कॅनडा बरोबर होणार आहे. या सामन्यासाठी आपण उपलब्ध राहणार असल्याचे ऑस्ट्रेलियन संघाची प्रमुख स्ट्रायकर सॅम केरने सांगितले. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. डाव्या पायाला झालेल्या स्नायु दुखापतीमुळे सॅम केरला या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यामध्ये खेळता आले नव्हते. कॅनडाचा संघ हा ऑलिम्पिक चॅम्पियन असल्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी आगामी सामन्यात प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांना दुसऱ्या सामन्यात नायजेरीयाकडून हार पत्करावी लागली होती.
सामन्याचे निकाल
स्वीडन-इटली : 5-0
अर्जेंटिना-द. आफ्रिका : 2-2









