कोल्हापूर / इम्रान गवंडी :
जिल्ह्यासह शहरात भटक्या व पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यासह मांजरांच्या हल्ल्यातही वाढ होत आहे. वर्षात कुत्रे व मांजरांनी हल्ल्यात 23 हजार 732 जणांचे लचके तोडले आहे. यामध्ये मांजरांच्या तुलनेत कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण अधिक आहे. वर्षात 7 जणांचा रेबीजने मृत्यू झाला. यामध्ये युवती, बालक, तरूणासह अन्य चौघांचा समावेश आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि निर्बीजिकरणाची मोहीम राबवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
एका वर्षातील आकडेवारीनुसार कुत्र्यांच्या हल्ल्यात 20 हजार 926 जण तर मांजराच्या हल्ल्यात 2 हजार 806 नागरिक जखमी झाले आहेत. महिन्याला सरासरी 1 हजार 900 नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. रोज सरासरी 40 ते 50 जण कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत आहेत. यामध्ये धावत्या गाडीमागे लागणाऱ्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे.
शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांच्या झुंडी पहायला मिळत आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण अधिक आहे. रात्री दुचाकीस्वारांचा भटकी कुत्री पाठलाग करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये कुत्र्यांना चुकवण्याच्या नादात अपघातही होत आहेत. महापालिकेकडून दरवर्षी निर्बिजीकरणावर लाखो रूपये खर्च केले जातात. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यास ठोस उपायोजना सापडत नसल्याचे सिद्ध होत आहे.
- मांजर व कुत्रे चावल्यानंतरचे होणारे धोके :
मांजर चावल्यास जखम आणि संसर्गाचा धोका असतो. रेबीजसारखा गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जखम स्वच्छ करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मांजराचे दात टोकदार असल्याने ते त्वचेला खोल जखम करू शकतात. मांजराच्या तोंडात अनेक जीवाणू असतात, जे जखमांतून आत जाऊन संसर्ग करू शकतात. काहीवेळा मांजरीच्या चाव्यामुळे टेनोसायनोव्हाइटिस किंवा संधिवात होण्याची शक्यता असते.
मांजर–कुत्रे चावल्यानंतर हे करा
जखम साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. जखम खोल व रक्तस्त्राव होत असेल तर त्वरीत डॉक्टरांना भेटा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टिटॅनस आणि रेबीज प्रतिबंधक लस घ्या. जखमेवर लालसरपणा, सूज, किंवा वेदना वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- रेबीज मृत्यू संख्या
–ग्रामीण : 2
–मनपा : 1
–जिल्हाबाह्या : 3
–राज्यबाह्य : 1
एकूण : 07
- कुत्र्यांचे लसीकरण
–महापालिका : 4500
–डेविल स्मिथ अॅनिमल वेल्फेअर (पहिला बुस्टर डोस) : 5500
–वर्ल्ड व्हेर्टनल संस्था (बुस्टर डोस) : 7 हजार
–निर्बिजीकरण : (महापालिका) : 2200
–निर्बिजिकरण : (सोसायटी फॉर अॅनिमल वेल्फेअर) : 2000
- पाळीव जनावरांच्या हल्ल्यांची संख्या :
महिना कुत्र्यांचा चावा मांजरांचा चावा एकूण
–जानेवारी : 1466 180 1646
–फेब्रुवारी : 1598 193 1791
–मार्च : 1810 143 1953
–एप्रिल : 1826 208 2034
–मे : 1916 300 2216
–जून : 1748 277 2025
–जुलै : 1430 274 1705
–ऑगस्ट : 1587 268 1855
–सप्टेंबर : 1865 205 2070
–ऑक्टोबर : 1877 258 2135
–नोव्हेंबर : 1845 233 2078
–डिसेंबर : 1958 267 2225
–एकूण : 20,926 2806 23,732
- लसिकरणाची मोहीम अधिक तीव्र
शहरात कुत्र्यांच्या लसिकरणाची मोहीम तीव्रतेने सुरू आहे. महापालिकेसह विविध सामाजिक संस्थांकडून लसीकरण केले जात आहे. शहरातील 7 हजार भटक्या श्वानांना पहिला, दुसरा बुस्टर डोस दिला आहे. 4 हजार श्वानांचे निर्बीजिकरण पूर्ण झाले आहे.
– डॉ. विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा








