बेळगाव : शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून ठिकठिकाणी कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी, बसस्थानक, गल्लोगल्ली, सरकारी कार्यालये येथे कुत्र्यांचा वावर नित्याचाच झाला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कुत्र्यांचा कळप वावरत असून पोलीस बंदोबस्तासाठी उभारण्यात आलेल्या चौकीत कुत्र्यांनी ठाण मांडल्याचे दिसून आले. यासाठी महापालिकेने याची दखल घेऊन त्वरित भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपासून शहरात कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरून कुत्र्यांचा कळप वावरत असल्याने नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे. प्रसंगी कुत्री अंगावर धावून येत असून नागरिकांचा चावा घेत असतात. यामुळे नागरिकांवर रेबिजची भीती वावरत आहे. तरीही महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे दिवसेंदिवस कुत्र्यांचा धोका वाढत चालला आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांवर निर्बंध घालणे गरजेचे आहे.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या कुत्र्यांचा वावर दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयात सतत नागरिकांची वर्दळ असते. आपल्या विविध कामांसाठी विविध भागातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असतात. मात्र कुत्री वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भटकी कुत्री पोलीस बंदोबस्तासाठी उभारण्यात आलेल्या चौकीमध्ये ठाण मांडले आहेत. तेथील खुर्ची, टेबल व बाकांवर अस्वच्छता पसरवत आहेत. त्वरित त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









