महानगरपालिका गांभीर्याने लक्ष देणार का? सर्वसामान्यांचा प्रश्न
बेळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, याबाबत महापालिकेकडे तक्रार आली नाही. त्यामुळे कुत्री पकडण्याची मोहीम सध्या तरी बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. विनायकनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 14 जणांचा चावा घेतला होता. मात्र, हा परिसर हिंडलगा ग्राम पंचायतच्या अखत्यारित येत असल्यामुळे त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले. शहरामध्ये कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कुत्र्यांवर नसबंदी प्रक्रिया केली जाते. मात्र, ही आकडेवारी अत्यंत कमी आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून महानगरपालिकेने गांभीर्याने याची दखल घेऊन कुत्र्यांच्या नसबंदीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. तक्रार आल्यानंतरच कारवाई करणार का? असा प्रश्नदेखील आता उपस्थित होत आहे. शास्त्राrनगर येथे कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केला होता. त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी जाऊन त्या कुत्र्याला पकडले होते. मात्र, इतर ठिकाणीही हल्ले झाल्याच्या घटना घडत आहेत. विनायकनगर परिसरात कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातला होता. तब्बल 14 जणांचा चावा घेतला. त्यानंतर तेथील नागरिकांनी स्वत:च त्या कुत्राचा बंदोबस्त केला आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत. तेव्हा महानगरपालिकेने गांभीर्याने दखल घेऊन कुत्र्यांवर नसबंदी करण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी होत आहे.









