अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले विदेश धोरण : चीनला अत्यंत मोठा झटका : तैवान-पेंटागॉनमध्ये सहकार्य
वृत्तसंस्था/ .वॉशिंग्टन
अमेरिकेच्या विदेश विभागाने स्वत:च्या धोरणांमध्ये अत्यंत मोठा बदल केला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाच्या दस्तऐवजांमध्ये यापूर्वी तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करत नसल्याचे नमूद होते. परंतु आता हे शब्द या दस्तऐवजांमधून वगळण्यात आले आहेत. स्वयंशासित बेट तैवानविषयी अमेरिकेच्या विदेश विभागाच्या वेबसाइटच्या नव्या ‘फॅक्टशीट’मध्ये ‘आम्ही तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करत नाही’ हे वाक्य सामील नाही. या फॅक्टशीटला अलिकडेच अपडेट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चीन तैवानला स्वत:चा भूभाग सांगत त्यावर कब्जा करण्याची तयारी करत आहे.
फॅक्टशीटमध्ये तैवानच्या आंतरराष्ट्रीय संघटनांमधील समावेशाविषयी दुरुस्ती करण्यात आली आहे. यात ‘देशाच्या दर्जाची आवश्यकता नाही’च्या संदर्भांना हटविण्यात आले आहे. चीनसोबत तैवानच्या वादाला ‘दबावापासू मुक्त, सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला लोकांकडून स्वीकारार्ह पद्धतीने’ सोडविण्यात यावे, असे यात म्हटले गेले आहे. तसेच तैवानच्या राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेसोबत पेंटागॉनच्या सहकार्याचे वर्णन करणारे एक वाक्यही जोडण्यात आले आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने वेबसाइटच्या फॅक्टशीटमध्ये करण्यात आलेले बदल नियमित स्वरुपाचे असल्याचे म्हटले आहे. तैवानसोबत आमच्या अनौपचारिक संबंधाविषयी सर्वसामान्य जनतेला कळविण्यासाठी फॅक्टशीट अपडेट करण्यात आली होती, असे विदेश विभागाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
अमेरिका स्वत:च्या ‘एक चीन धोरणा’बद्दल प्रतिबद्ध आहे. केवळ एक चिनी सरकार असल्याची चीनची स्थिती अमेरिका स्वीकारतो. तसेच तैवान सामुद्रधुनीच्या शांतता अन् स्थैर्याला कायम राखायचे असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्याने नमूद केले आहे.
चीन-तैवान चर्चेचे समर्थन
आम्ही कुठल्याही बाजूकडून जैसे थे स्थितीत एकतर्फी बदलाला विरोध करतो. क्रॉस-स्ट्रेट संवादाला आमचे समर्थन आहे. क्रॉस-स्ट्रेट मतभेदांना शांततापूर्ण पद्धतीने, दबावापासून मुक्त, सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजुच्या लोकांकडून स्वीकारार्ह पद्धतीने तोडगा काढत दूर केले जाईल, अशी अपेक्षा असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तैवानमधील अमेरिकन संस्थेने यासंबंधी तूर्त टिप्पणी करणे टाळले आहे. तैपेई येथील अमेरिकन संस्था ही एकप्रकारे अमेरिकेचा दूतावास असल्याचे मानले जाते.
चीनकडून नाराजी व्यक्त
अमेरिकेच्या विदेश विभागाने या मुद्द्यावर अधिक सांगणे तूर्तास टाळले आहे. तर दुसरीकडे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नाराजी व्यक्त केली आहे. तैवानशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेची स्थिती ‘गंभीर स्वरुपात’ बदलली आहे. अमेरिकेकडून तैवानचा वापर चीनवर दबाव आणण्यासाठी करण्याच्या चुकीच्या धोरणांचे आणखी एक उदाहरण आहे. स्वत:च्या चुका त्वरित सुधारण्याचे आवाहन आम्ही अमेरिकेला करत आहोत, असे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.









